देवगिरी एक्स्प्रेसमध्ये सशस्त्र दरोडा; दोन अल्पवयीनांसह आठ अटकेत…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

देवगिरी एक्स्प्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर दरोडेखोरांनी तासभर डब्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमध्ये (Devagiri Express) आठ ते दहा दरोडेखोरांनी चाकू, ब्लेडचा धाक दाखवत दहा ते पंधरा प्रवाशांना लुटल्याची घटना मंगळवारी (6 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत रेल्वे प्रवाशांनी रेल्वे कंट्रोल रुमला माहिती देताच कल्याण रेल्वे पोलिसांनी (Kalyan Railway Police) तात्काळ कल्याण रेल्वे स्थानकावर सापळा रचत सहा दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या तर दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेतले आहे. रोहित जाधव, विलास लांडगे, कपिल उर्फ प्रकाश निकम, करण वाहने, राहुल राठोड, निलेश चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत तर दोन अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

देवगिरी एक्स्प्रेसने मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास कसारा स्थानक सोडल्यानंतर आठ तरुण एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक S1 आणि S2 मध्ये शिरले. हे सर्व तरुण नशेत होते. या तरुणांनी धारदार शस्त्र दाखवत प्रवाशांच्या वस्तू आणि पैसे हिसकावून घेतले. ज्या प्रवाशांनी विरोध केला त्यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार जवळपास एक तास सुरु होता. काही धाडसी प्रवाशांनी कल्याण रेल्वे कंट्रोलला या घटनेची माहिती दिली. कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण जीआरपी पोलिसांचे पथक कल्याण स्थानकात पोहोचले. ही गाडी फक्त दोन ते तीन मिनिट कल्याण स्थानकावर थांबते. या कालावधीत जीआरपी पोलिसांनी लूटमार करणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेतले.

याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. रोहित जाधव, विलास लांडगे, कपिल उर्फ प्रकाश निकम, करण वाहने, राहुल राठोड, निलेश चव्हाण यांच्यासोबत दोन अल्पवयीन तरुणांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्व आरोपींना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले असता या आरोपींना कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून औरंगाबादचे रहिवासी आहेत. पुढील तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.