ना. अनिल पाटील यांचे जळगाव येथे जल्लोषात स्वागत

0

जळगाव;- मुंबई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांची मंत्रिपदी निवड झाली यात अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनाही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली .मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नामदार अनिल पाटील यांचे आगमन आज जळगाव जिल्ह्यात झाले असून आज त्यांचा वाढदिवस असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान जळगावच्या रेल्वे स्टेशनवर त्यांचे जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले.

आज म ७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते वाराणसी महानगरी एक्सप्रेसने ते सकाळी सात वाजेच्यासुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाले. याप्रसंगी फलाटावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ना. अनिल पाटील यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. ढोल-ताशांचा गजरात ना. अनिलदादांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ना. अनिल पाटील यांनी ट्रेनमधून उतरण्याआधी चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला.

ना. अनिल पाटील हे ट्रेनमधून उतरल्यानंतर फलाटावर त्यांना मानाचा फेटा बांधण्यात आला. यानंतर पुष्पवर्षावरत त्यांचे स्वागत करण्यात आले. तर अनेक जणांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. फलाटावरून रेल्वे स्थानकाच्या बाहेर आल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी जयघोषाने परिसर दुमदुमला होता. फलाटावरून बाहेर आल्यानंतर मंत्री अनिल पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन केले. यानंतर ते पायी चालत समर्थकांसह पुढे आले. याप्रसंगी दोन जेसीबींमधून त्यांच्यावर पाकळ्यांचा वर्षाव करत जोरदार स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी विनोद देशमुख, रवींद्र नाना पाटील, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, ॲड. कुणाल पवार आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यानंतर ना. अनिल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.