धक्कादायक.. मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती : येथील शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे मुख्याध्यापकाने  केस कातरून त्याला ‘बॅड टच’ केल्याची धक्कादायक घटना  एका नामांकित शाळेत मंगळवारी उघडीस आली आहे . याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी संबंधित ४८ वर्षीय मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

शहरातील सातुर्णास्थित नामांकित शाळेत २१ मार्च रोजी बालकाचे केस कापल्याची घटना घडली. हा सहा वर्षीय मुुलगा त्या शाळेत पहिलीत शिकतो. सोमवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही वेळाने मुख्याध्यापकाने त्याला कार्यालयात बोलावले.

त्याचे केस व्यवस्थित असतानाही ते कात्रीने कापले. विचित्र अंगविक्षेप केले. बालकाला ‘बॅड टच’देखील केला. अकस्मात घडलेल्या त्या घटनेमुळे तो चिमुकला भेदरला. समवयस्क व वर्गशिक्षकाला सांगण्याचे धाडस त्या लहानग्याला झाले नाही.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी पोर गुमसुम असल्याचे लक्षात येताच त्याच्या वडिलांनी त्याला कवेत घेतले. बाळ, काय झाले रे, असे आपुलकीने विचारताच तो एकदम रडायला लागला. त्याने वडिलांच्या कुशीत झेपावत शाळेत घडलेला प्रसंग सांगितला. तो भेदरला असल्याने वडिलांनी त्याला धीर दिला. मी तुझ्या मुख्याध्यापकांशी जाऊन बोलतो, असे म्हणत वडिलांनी त्याला प्रेमाने गोंजारले.

मुलासोबत घडलेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी वडील मंगळवारी शाळेत पोहोचले. मुख्याध्यापकाने त्यांनादेखील अश्लील शिवीगाळ केली. ‘तुला माहीत नाही, ही शाळा कुणाची आहे. तो तुझा बाप आहे. मुकाट्याने येथून निघून जा,’ अशी धमकी वडिलांना देण्यात आली. त्यामुळे वडिलांनी मंगळवारी दुपारी थेट राजापेठ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मुख्याध्यापकाला तत्काळ बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुद्ध पोक्सो व भांदविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित पालकाच्या तक्रारीवरुन ‘त्या’ मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला. त्याला मंगळवारी तातडीने अटक करण्यात आली.

मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ

Leave A Reply

Your email address will not be published.