हृदयद्रावक; भाऊ म्हणाला “आज तू येऊ नको”; आणि 13 वर्षीय मुलाचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

आज ८ मार्च रोजी दुपारी चार वाजता आसोदा रस्त्यावरील लेंडी नाला पुलाच्या पुढे अपघात झाला. ज्यामध्ये 13 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रोहण कैलास पाटील (१३)  रा. चिंचोली, ता. जळगाव हा मुलगा जागीच ठार झाला. तर त्याचा मावस भाऊ अक्षय संदीप इखे (२६), रा. चिंचोली, ता. जळगाव हा तरुण जखमी झाला. अपघातानंतर चालक डंपर जागेवर सोडून पसार झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील चिंचोली येथील मजुरी करणारे कैलास पाटील यांचा मुलगा रोहण व त्याचा मावस भाऊ अक्षय इखे हे दोघे जण शुक्रवारी दुपारी आसोदा येथे दुचाकीने (एमएच १९, डीएफ ६५०१) गुरांसाठी चारा पाहण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना लेंडी नाला पुलाच्या समोरुन येणाऱ्या डंपरची (एमएच १५, एके ३७२३) दुचाकीला जबर धडक बसली. त्यात अक्षय इखे हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला तर 13 वर्षीय रोहण हा डंपरच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर तालुका पोलिस स्टेशन चे कर्मचारी घटनास्थळी पोहचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. अपघात होताच चालक डंपर जागेवर सोडून पसार झाला. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले आहे.

घटनेची माहिती मिळताच मयत मुलाच्या आई-वडिलांसह नातेवाईक, गावकऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आई वडीलांनी एकच आक्रोश केला. रोहण हा एकुलता एक मुलगा होता. व त्याला एक बहिण आहे.

अक्षय एकटा जाणार होता मात्र रोहणने हट्ट करत त्याच्यासोबत जायला निघाला. त्या वेळी अक्षयने त्याला “आज तू येऊ नको”. असे अनेकदा सांगितले मात्र त्याने एक ऐकले नाही. दरम्यान घरी परतण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली. रोहण हा मावस भाऊ अक्षयच्या कायम सोबत रहायचा. मात्र या १३ वर्षीय भावाने अचानक साथ सोडल्याने अक्षयलाही धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.