डंपरची जोरदार धडक, दोन तरुण ठार

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव मार्गावरील कोळन्हावी फाट्यावर मोटरसायकलला अज्ञात डंपरने धडक दिल्याने भीषण अपघातात सावखेडा सिम येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सावखेडा सिम गावावर शोककळा पसरली आहे. एकाच गल्लीत राहणारे हे दोघं तरुण असून दुःखद अंतकरणाने गाववासियांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

अमोल राजेंद्र पाटील (वय २६, रा. सावखेडा सिम, ह .मु.जळगाव) व ईस्माइल हबीब तडवी (वय ३०, रा. सावखेडा सिम ता. यावल) हे दोघे तरुण त्यांच्याकडील मोटरसायकलने (क्रमांक १९ डी बी २७४६) किनगाव कडे जात असतांना दि. १० फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास किनगावकडून सुसाट वेगाने येणाऱ्या एका अज्ञात डंपरने धडक दिली.या भीषण अपघातात अमोल राजेंद्र पाटील या तरूणाचा जागीच मृत्यु झाला तर ईस्माईल हबीब तडवी हा तरूण गंभीर जखमी झाला होता. या दोघांना घटनास्थळावरून तात्काळ जळगाव येथे पाठविण्यात आले होते.

दरम्यान उपचार घेत असताना इस्माईल तडवी हा देखील रात्री मयत झाला. अमोलचे यावर्षी लग्न करण्याचे ठरले असून हा एकुलता एक मुलगा होता. त्यास तीन बहिणी, आई, वडील असा परिवार आहे. तर इस्माईल याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन वर्षाची चिमुरडी मुलगी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.