जिल्हा बँकेचे चेअरमनपद आणि देवकरांचा राजीनामा

0

लोकशाही संपादकीय लेख

वर्षभरापूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. सहकारात राजकारण नको म्हणून सर्वपक्षीय पॅनल तयार करून सर्वांच्या संमतीने बिनविरोध निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्या नेत्यांमध्ये बैठकींवर बैठका झाल्या. माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुढाकार घेतला होता. परंतु भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सर्वपक्षीय पॅनल मधून भाजपचा काढता पाय घेतला. आणि भाजप स्वतंत्रपणे लढणार, असे जाहीर केले. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपची समोरासमोर लढत होईल असे चित्र निर्माण करण्यात आले. तथापि ऐनवेळी गिरीश महाजनांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीचे पॅनल निवडून आले. त्यात सर्वाधिक नऊ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला, पाच जागा शिवसेनेला आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. त्यानंतर चेअरमनच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस निर्माण झाली.

एकनाथराव खडसेंकडून चेअरमन पदी पुन्हा एडवोकेट रोहिणी खडसे यांची वर्णी लागण्याचे स्वप्न होते. ते स्वप्न बाजूला राहून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सूचनेनुसार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव पुढे आले. आणि सर्व संमतीने गुलाबराव देवकर चेअरमन पदी तर शिवसेनेचे नेते शामकांत सोनवणे यांची चेअरमन पदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला तीन वर्षे चेअरमन पद देण्याचे ठरले. त्यानंतर दोन वर्षे शिवसेनेचे चेअरमन असेल असे ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे प्रत्येक वर्षाचा एका संचालकाला चेअरमन पदाची संधी देण्याची ठरले. त्यात गेल्या सोमवारी गुलाबराव देवकर आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा देणार होते. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की गुलाबराव देवकर यांना चेअरमन पद एक वर्ष वाढवून द्यावे. कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन देवकरांनी सोमवारी राजीनामा न देता कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यावेळी ठरल्याप्रमाणे राजीनामा देऊन दुसऱ्याला संधी मिळाली पाहिजे याबाबत देवकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी देवकरांनी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला. परंतु एक दिवसांचा राजीनामा देण्यात जो विलंब झाला त्याबाबत तर्कवितर्क लावले गेले. परंतु गुलाबराव देवकर यांचा समंजसपणा आणि संयम दिसून आला. आणि हेच एक परिपक्व नेतृत्वाचे लक्षण म्हणता येईल.

जिल्हा बँकेचे चेअरमन पदाच्या एक वर्षाच्या कारकिर्दीबद्दल गुलाबराव देवकर यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा बँक चेअरमन पदाचा पदभार वर्षभरापूर्वी स्वीकारला तेव्हा बँकेचा शंभर कोटी रुपयांचा संचित तोटा होता. आणि एनपीए 50 टक्क्याहून अधिक होता. वर्षभरात यावल येथील जे टी महाजन सहकारी सूतगिरणीची विक्री करून नऊ कोटी रुपयांचे बँकेचे कर्ज वसूल केले. शंभर कोटी रुपयांच्या संचित तोट्यातून नऊ कोटी कमी झाले. त्यानंतर गुलाबराव देवकरांच्या चेअरमन पदाच्या कालावधीत मधुकर सहकारी साखर कारखान्याकडून बँकेचे 66 कोटी कर्जाची थकबाकी होती. सिक्युरिटायझेशनच्या कायद्याअंतर्गत सदर मधुकर सहकारी साखर कारखाना बँकेच्या ताब्यात आल्यानंतर त्याची जाहीर लिलावाद्वारे विक्री करून 66 कोटी रुपयांच्या खर्चाची वसुली केली. म्हणजे शंभर कोटीच्या बँकेच्या संचित कोट्यातून 66 कोटी कमी होऊन बँक आता ३० कोटीच्या संचित तोट्यावर आली. आणि एनपीए सुद्धा ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर वसंत सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीची प्रक्रिया जवळजवळ पूर्णत्वास आली असून त्यातून 50 कोटी रुपये बँकेला मिळतील. हे 50 कोटी बँकेला मिळाल्यावर बँकेचा संचित तोटा संपेल आणि बँक नफ्याचा बाजूने वाटचाल करेल. हे सर्व करत असताना बँकेने शेतकऱ्यांचे हित जोपासले, असे गुलाबराव देवकऱ्यांनी अभिमानाने चेअरमन पदावरून पाय उतार झाले तेव्हा सांगितले. देवकरांनी खंत एकच गोष्टीची व्यक्त केली आणि ती म्हणजे मधुकर सहकारी साखर कारखाना पूर्णपणे कायद्याचे पालन करून विक्री प्रक्रिया केली असताना केवळ राजकीय द्वेषापोटी विक्री प्रक्रियेला स्थगिती दिली गेली. स्थगिती आदेश देऊन सव्वा महिना उलटला तरी शासनाचे कसलेच निर्देश अद्याप प्राप्त झाले नाही. त्यामुळे 26 जानेवारीला सुरू होणारा साखर कारखाना अद्याप सुरू होत नसल्याने कामगार जिल्हा बँक आणि कारखाना विक्रेते विकत घेणारे संभ्रमात आहेत…!

Leave A Reply

Your email address will not be published.