श्री गणरायाच्या आशीर्वादाने मी अपघातातून बचावलो – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

आम्ही मुलींनी पहिल्यांदा होस्टेलमध्ये गणरायाची स्थापना केली होती - आयुक्त डॉ. विद्या गायकवाड गणपतीच्या डेकोरेशनसाठी घरात भांडण केलं होतं - डॉ. अमित भंगाळे

0

 

माझ्या आठवणीतला गणेशोत्सव

आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव

डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, जळगाव म.न.पा.

डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा भंगाळे, आनंद हॉस्पिटल डायलिसिस युनिट

शब्दांकन : राहुल पवार

जळगावत हर्शोल्ल्हासाचं वातावरण आहे, याचा मला व्यक्तिगत आनंद आहे. मात्र एक गाव एक गणपती, तसेच एक वार्ड एक गणपती ही संकल्पना रुजू व्हावी अशी इच्छा आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच आगामी सण उत्सव हे देखील शांततेत आणि उत्साहात मोठ्या भक्ती भावाने साजरे करावे. उत्तेजित होऊन कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका, असे आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकशाहीच्या कार्यालयात श्री गणेशाच्या आरती प्रसंगी जळगावकरांना केले. यावेळी आरतीसाठी जळगाव शहर मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, आनंद हॉस्पिटल डायलिसिस युनिटचे संचालक डॉ. आनंद भंगाळे व डॉ. नेहा भंगाळे उपस्थित होते.
दैनिक लोकशाहीच्या कार्यालयात दरवर्षीप्रमाणे शहरातील उच्चपदस्थ व्यक्तींच्या हातून श्री गणरायाची सायंकाळची आरती करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये पहिल्या दिवशी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्या आठवणीतल्या गणपती संदर्भात आठवण सांगितली. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, माझ्या लहानपणी गणरायाचं आगमन आमच्या घरी होत असे. मी सात-आठ वर्षाचा असेल तेव्हा म्हैसूर येथे प्रथम आमच्या घरी गणपती बसवण्यात आले होते. ही आठवण माझ्यासाठी विशेष आहे. त्याचप्रमाणे ओझरच्या गणपतीचं मला फार आकर्षण आहे. त्यासाठी फार मोठी घटना माझ्या आयुष्यभर लक्षात राहणारी आहे.
मी जुन्नर येथे भारत सरकारच्या एका कार्यक्रमानिमित्त मी जुन्नर येथे जात असताना माझ्या गाडीला भयंकर मोठा अपघात झाला होता. एका ट्रकला माझ्या गाडीचा अपघात झाला होता. मात्र श्री गणरायाच्या आशीर्वादानेच मी या अपघातातून अत्यंत सही सलामत वाचलो. मला कुठलीही इजा झाली नाही. विशेष म्हणजे जुन्नर होऊन आम्ही ओझर येथे पहिला स्टॉप घेणार होतो, आणि विघ्नहर्त्याच्या या आशीर्वादामुळे मी अपघातातून पूर्णपणे सुखरूप बचावलो.
लोकशाहीच्या कार्यालयात श्री गणरायाच्या आरतीसाठी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनीही उपस्थिती दिली. यावेळी त्यांनी आपल्या आठवणीतल्या गणेशोत्सवाबद्दल आठवण कथन केली. त्या म्हणाल्या २००२-३ मध्ये आम्ही भगवान कॉलेजला होस्टेलला असताना पहिल्यांदा मुलींनी मिळून गणपती बसवण्याची प्रक्रिया राबवली होती. विशेष म्हणजे त्यावेळी फक्त मुलं एकत्रित येऊन उत्साहात गणपती बसवायचे. मात्र आम्ही मुलींनी पहिल्यांदा पुरुषांचे वर्चस्व घालवून एकत्रित येत उत्साहात होस्टेलमध्ये गणपती बसवला होता. आम्ही मुलींनी पन्नास पन्नास रुपये जमवून श्री गणपतीची मूर्ती आणली. त्यासाठी लागणारी आरास आणि इतर सर्व आवश्यक ती कामे करून हॉस्टेलमध्ये पहिल्यांदा मुलींच्या वेगळ्या गणपतीची स्थापना केली होती.
मी महिलांना देखील आवाहन करेल की त्यांनीही एकत्रित येऊन समाजातील विविध प्रकल्पांमध्ये सहभाग घेऊन आपले योगदान द्यावं. त्याचप्रमाणे यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र श्री गणरायाचे आगमन होताचं पावसाचेही आगमन झाले. ही एक प्रकारे गणरायाची कृपा आपल्यावर झाली आहे. सर्वांनी मी एकच आवाहन करते की, सर्वांनी आनंदात आणि शांततेत गणेशोत्सव साजरा करावा. कायदा सुव्यवस्था राखली जाऊन आणि परिसरात कुठलीही अस्वच्छता निर्माण होणार नाही याची काळजी करून आपण गणेशोत्सव साजरा करावा.
गणरायाच्या आरतीला आनंद हॉस्पिटल डायलिसिस युनिटचे संचालक डॉ. अमित भंगाळे आणि डॉ. नेहा भंगाळे यांनी देखील आपल्या आठवणीतील गणपती बद्दल मत व्यक्त केले. डॉ. अमित भंगाळे म्हणाले, मी लहानपणी पहिल्यांदा गणपतीचे डेकोरेशन आणि सजावटीसाठी घरी अक्षरशः भांडण करून आरास तयार केली होती. विशेष म्हणजे तेव्हा आता सारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. मी राहतो त्या भवानी पेठ परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा. मात्र माझ्या घरी फक्त गणरायाची स्थापना व्हायची. त्यासाठी असं डेकोरेशन किंवा सजावट होत नसे. मात्र मी पहिल्यांदा डेकोरेशन करण्यासंदर्भात आग्रह धरला होता आणि माझ्या आई-वडिलांच्या मदतीतून पहिल्यांदा आरास निर्माण करून श्री गणरायाची स्थापना केली होती.
यावेळी डॉ. नेहा भंगाळे गणरायाच्या आठवणी बद्दल म्हणाल्या, आता बसवलेल्या गणपती पेक्षा लहानपणीच्या गणपतीच्या आठवणी या माझ्यासाठी विशेष आहेत. आता अनेक सुविधा निर्माण झाल्या आहेत. मात्र त्यामानाने आनंद कमी वाटतो. जो आनंद मला गणपती बसवण्यासाठी लहानपणी वाटायचा, त्याचं प्रमाण आताच्या सुविधा असलेल्या काळात कमी झालं असं वाटतं. कारण लहानपणी सुविधा नसताना गणपती बसवण्यात एक वेगळाच आनंद मिळत असे. आताच्या पिढीला हा आनंद अनुभवता येणार नाही याची खंत वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.