बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला तर गुन्हा कमी होईल – आयुक्त डॉ. विद्या गायकवाड

किडनी प्रत्यारोपण सुविधा जळगाव येथे सुरू करण्याचा मानस - डॉ. अमित भंगाळे

0

 

माझ्या स्वप्नातील जळगाव

 

शहरातील तरुणांना रोजगार मिळाला तर शहरातील बेकायदेशीर कामे बंद होतील. परिणामी शहरातील गुन्हा कमी होईल. त्याचप्रमाणे शहरात उद्योग निर्मिती सुद्धा होऊन आर्थिक सुबत्ता येईल, असे मत जळगाव शहर मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी लोकशाही कार्यालयात व्यक्त केले. श्री गणरायाच्या आरतीसाठी त्या सायंकाळी उपस्थित होत्या.
पुढे बोलताना डॉ. विद्या गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थ्यांसाठी नैतिक शिक्षण देखील गरजेचे आहे. प्रसारमाध्यमांवरील चुकीच्या गोष्टी नजरेत पडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा संदेश पसरतोय आणि तशीच समज होत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्कारीत करणं ही काळाची गरज ठरेल. जर मुलांना नैतिक शिक्षण दिलं, विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना समाजाप्रती वैचारिक दृष्ट्या सक्षम केलं तर स्वप्नातील जळगाव साध्य करायला वेळ लागणार नाही.
तसेच शहरांमध्ये नागरी विकास होणे देखील अत्यंत गरजेचे आहे. आम्ही प्रशासक म्हणून त्यात योगदान देत असलो तरी, नागरिकांनीही आपले योगदान देणे गरजेचे आहे. दोघांच्या समन्वयातूनच जळगाव शहर स्वप्नातील जळगाव म्हणून उदयास येईल आणि ही सुवर्णनगरी अधिक शोभून दिसेल.
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील लोकशाही कार्यालयात स्वप्नातील जळगाव संकल्पनेबाबत आपले विचार व्यक्त केले. विकास म्हणजे ही दुसरी तिसरी वेगळी कल्पना नसून आधीच्या कामापेक्षा चांगलं काम करून आपलं योगदान वाढवणे आणि आपल्या कामात विकास साधने म्हणजे खरा विकास होय, असे मत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले. आपल्या कामाचा दर्जा वाढला तर जळगाव शहराच्या विकासात फार मोठा हातभार लागेल असेही ते म्हणाले.
दरम्यान आनंद हॉस्पिटल डायलिसिस युनिटचे संचालक डॉ. अमित भंगाळे यांनी स्वप्नातील जळगाव या संकल्पनेबाबत आपले मत व्यक्त करताना सांगितले की, जळगावचा विकास होणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. मी लहान असताना शाळेत जाण्यासाठी ज्या रस्त्याचा वापर करायचो त्या रस्त्यावर पाण्याचे डबके साचलेले असायचे. मात्र आज जेव्हा मी त्या रस्त्या रस्त्याने जातो तेव्हा देखील ते डबके तसेच कायम आहे. त्यात कुठलीही सुधारणा झालेली नाही. ही सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे. तरच आपण जळगाव स्वप्नातील जळगाव ही संकल्पना प्रत्यक्षात राबवू शकू.
त्याचप्रमाणे जळगाव शहरांमध्ये किडनी प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करण्याचा माझा मानस आहे. वैद्यकीय सुविधा शहरात अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत. मात्र आवश्यक त्या प्रमाणात त्या सुविधा नसल्याने बऱ्याचदा गैरसोय होते. मी वैद्यकीय माध्यमातून जळगावत किडनी प्रत्यारोपण सुविधा आणून यात योगदान देण्याचा प्रयत्न कर करत आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
मुळात स्वप्नातलं जळगाव ही संकल्पना राबवण्याची गरजच या समस्येतून निर्माण झाली आहे जळगाव आहे त्या परिस्थितीत कमी विकसित आहे. त्यामुळे आपल्याला स्वप्नातलं जळगाव हा विचार करावा लागतोय, ही खंत आनंद हॉस्पिटल डायलिसिस युनिटच्या डॉ. नेहा भंगाळे यांनी व्यक्त केले. ही कमतरता भरून काढण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणं अत्यंत गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.