ठेका रद्द करण्यासाठी सर्वांचेच हात ‘वर’!

0

कंपनी म्हणते आम्ही सोडतो : अधिकाऱ्यांचे मात्र तळ्यात-मळ्यात
जळगाव ;– जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका चालकांचे गेल्या पाच महिन्यांपासून मानधन दिले नसतांनाही संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरुन दुर्लक्ष होत असून रुग्णवाहिका चालकांचे मात्र आर्थिक नुकसान होत आहे. आता तर कंपनीच करार सोडून पळ काढत असून कंपनीवर कारवार्इ करण्याचे सोडून अधिकारी मात्र ठेकेदाराला पायघड्या टाकत असल्याचे समोर आले आहे. कंपनीला आर्थिक चणचण असल्याने ते यातून काढता पाय घेत असले तरी रुग्णवाहिका चालकांच्या मानधनाचे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

जळगाव सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिकेवरील चालकांचे गेल्या पाच महिन्यांपासून मानधन थकले असतांनाही ठेकेदार असलेल्या राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीने रुग्णवाहिका चालकांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. या संदर्भात रुग्णवाहिका चालकांनी जिल्हा शल्स चिकित्सक, सहसंचालक (तांत्रिक), सहसंचालक (खरेदी) आरोग्य सेवा, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवूनही काहीही उपयोग होत नसल्याने रुग्णवाहिका चालक आता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारी असतांनाही शासनस्तरावरुन काहीही हालचाल मात्र होतांना दिसत नाही.

कारवार्इ करणार तरी कोण?
ठेकेदार असलेल्या राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीला खरेदी कक्षाचे तत्कालीन सहसंचालक डॉ. उमेशा शिरोडकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती; ठेकेदाराने या नोटीसला केराची टोपली दाखविली असतांनाही अधिकारी मात्र मूग गिळून बसले आहेत. खरेदी कक्ष आता आयुक्तांकडे बोट दाखवित असून आयुक्त जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निर्णयाकडे डोळे लावून आहेत. एकमेकांकडे बोट दाखविण्यात ही मंडळी धन्यता मानत असून त्यात रुग्णवाहिका चालकांचे मात्र हाल होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.