वादळाचा फटका; ५१ फुटी विठ्ठल मूर्ती कोसळली, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

0

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या  पाच-सहा दिवसांत राज्याच्या अनेक भागात पावसाने हाहा:कार माजवला आहे. जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या नैसर्गिक संकटाचा तडाखा देवालाही बसला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील प्रसिद्ध ५१ फुटी विठ्ठलाची मूर्ती वादळामुळे कोसळल्याची दुर्दैवी घटना काल रविवारी दुपारी घडली. दरम्यान, या घटनेनंतर ही मूर्ती प्रचंड अशा वाऱ्यामुळे कोसळली असून इतर अफवांवरत कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात ५१ फूट उंच विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली होती. काल दुपारी वादळाचा मोठा फटका या मूर्तीला बसला. वादळी वाऱ्याचा वेग इतका होता की, त्यामुळे विठ्ठलाची मूर्ती समोरच्या बाजूला झुकून खाली आली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी आवाहन केले आहे की, ‘ही एक नैसर्गिक आपत्ती होती.

यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या चक्रीवादळात ही विठ्ठलाची मूर्ती खाली आली आहे. तरी सर्वांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कुठल्याही अफवा पसरवू नये’, अशी नम्र विनंती केली आहे. वाटूरमधील ५१ फूट उंच विठ्ठलाची मूर्ती ही अत्यंत मनमोहक आणि सर्वांना आकर्षित करणारी होती. मोठ्या भक्तीभावाने आषाढी एकादशीला भाविकांनी या परिसरात गर्दी केली होती. ५१ फुटी मूर्ती पाहण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी भेटी देत होते. पण वादळी वाऱ्यामुळे ही मूर्ती कोसळल्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.