कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राजीनामा देणार..

0

बंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा राजीनामा देणार आहेत. दुपारी जेवणानंतर राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती येडियुरप्पांनी दिली. कर्नाटकमधील येडियुरप्पा सरकारला २ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. आपण राजीनामा देणार नसल्याचं येडियुरप्पांनी म्हटलं होतं. त्यानंतर दिल्लीत बैठकांचं सत्र सुरू होतं.

 

मागील  अनेक आठवड्यांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात येडियुरप्पांच्या राजीनाम्याची चर्चा होती. अखेर आज येडियुरप्पांनी व्यासपीठावरून राजीनाम्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही, असं येडियुरप्पा म्हणाले. ‘माझ्यावर कर्नाटकच्या जनतेचं ऋण आहे. जनतेचा आपल्यावर विश्वास राहिलेला नाही, हे मी आमदार आणि अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो. आपण प्रामाणिकपणे काम करायला हवं आणि स्वच्छ प्रशासन द्यायला हवं. अनेक अधिकारी प्रामाणिक आहेत. सर्वांनी तसं व्हायला हवं,’ अशी अपेक्षा त्यांनी राजीनाम्याची घोषणा करताना बोलून दाखवली.

“मी राजीनामा कुठल्यादी दु:खात देत नाही, आनंदाने राजीनामा देतोय,” असं भावनिक होत येडियुरप्पा यांनी घोषणा केली. कर्नाटकमधील भाजप सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमात बी. एस. येडियुरप्पा बोलत होते.

भारतीय जनता पक्षानं 2019 साली 75 वर्षांच्या आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवण्याचं धोरण सोडलं आणि बी. एस. येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी बसवलं होतं. त्यापूर्वी 2008 साली येडियुरप्पा जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते दक्षिण भारतातले भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री होते. तीन वर्षांतच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या व्होट बँकेचं मोठं नुकसान केलं. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी मोदींनी त्यांना परत पक्षात आणलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.