भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही; राजनाथ सिंग यांचा इशारा (व्हिडीओ)

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारताने आजवर आक्रमण केलेलं नाही किंवा कब्जा केलेला नाही. भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही. आम्ही इकडंच नाही तर तिकडं जाऊनही मारु शकतो,  अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.  सगळे बदलू शकतात पण शेजारी बदलू शकत नाहीत.  मात्र आम्ही भारत मातेचे मस्तक झुकू देणार नाहीत, असं राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांच्या हस्ते दोंडाईचा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन झालं.

महाराष्ट्र  वीरांची भूमी 

तुम्ही सगळे कसे आहात असं म्हणत राजनाथ सिंह यांनी भाषणाला मराठीतून सुरुवात केली.  राजनाथ सिंह म्हणाले की,  मी उत्तरप्रदेशातून आलो आहे.  उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र यांचा जवळचा संबंध आहे. मी महाराष्ट्रात जेव्हा येतो तेव्हा मला खूप आनंद होतो.  वीरांची भूमी म्हणून महाराष्ट्र भूमीची ओळख आहे.  आजही केवळ महाराष्ट्रात नाही तर सगळीकडे शिवाजी महाराज भरलेले आहेत.  अमेरिका धनवान आहे म्हणून तिथले रस्ते चांगले नाही तर सरकार धनवान आहे म्हणून रस्ते चांगले आहेत. नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली उत्तम काम सुरू आहे, असं सिंह म्हणाले.

सिंह म्हणाले की,  बिपीन रावत यांच्या नावाने पहिला मार्ग इथे सुरू झाला याचं श्रेय दोंडाईचा नगरपालिकेला जातं. देशाच्या जवानांना सुरक्षित ठेऊ आणि देशाचा आपण विकास करू असंही ते म्हणाले.  राममंदिराची निर्मिती न्यायव्यस्थेतून झाली आहे, असंही ते म्हणाले.

तसेच सिंह म्हणाले की, जेव्हापासून देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून फक्त आश्वासने दिली गेली.  नेत्यांवरील विश्वास कमी झाला आहे. मात्र आम्ही जे बोलू ते करून दाखवू.  2019 च्या जाहीरनाम्यात जे लिहिलं होतं ते पूर्ण करू, असं सिंह म्हणाले.

विविध विकास कामांचे लोकार्पण 

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आलं. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांच्या स्मारकाचे  उद्घाटन झालं.  त्यांच्या हस्ते जनरल बिपिन रावत या रोडचे उद्घाटन देखील झालं.  तसेच श्रीमंत राजे दौलतसिंह रावल यांचा पुतळा, शहीद अब्दुल हमीद स्मारक आणि वॉर ट्रॉफी पुतळ्याचे देखील राजनाथ सिंह यांच्या हस्ते अनावरण झालं.  राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा लावण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.