बैल पोळा.. शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

आज श्रावणात पिठोरी अमावस्येला महाराष्ट्रात सर्जा- राजाचा सण हा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. शेतकऱ्यांचा मित्र समजला जाणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. या सणाला शेतकरी त्यांच्या एकूणच परिवारासाठी अंत्यत उत्साह असतो.

या दिवशी बैलाची पूजा करून गावभर त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. गावात मिरवणूक झाल्यानंतर घरी महिला बैलांची पूजा करतात. काही ठिकाणी मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात. बैलपोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा करतात. आदल्या दिवशी खांदंमळणी केली झाले. पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांना सजवलं जातं. झुल चढवली जाते. गळ्यात चंगाळी, शिंगाना रंगवलं जातं.

‘ पोळ’ म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा जुन्या काळात होती आता अनेक शेतकऱ्याकडेच बैल नाहीत तर गावावर बैल सोडणार कुठून? या बैलाला काही ठिकाणी पोळ म्हणतात तर काही ठिकाणी ‘पोळ्याचा वळू’ तर काही गावात या बैलालाच पोळा म्हणतात. या बैलाला गावावर सोडण्यापूर्वी त्याला धुऊन, रंगवून सजवीत आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गाई आणून उभ्या करीत. मग त्याच्या कानात ‘तू वासरांचा पिता` अशा अर्थाचा मंत्र म्हणत. ‘ हा तुमचा पती आहे.’ अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत. पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वषिंड मोठे, शेपटी मऊ व लांब केसांची, गाल कोवळे, पृष्ठभाग रूंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकदार, बांधा डौलदार, आणि मोठ्याने डिरक्या देणारा बैलच निवडला जायचा.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ट्वीट करत बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या कृषी संस्कृतीत बैलपोळा सणाचे मोठे महत्त्व आहे. शेतीला आधुनिकता प्राप्त होत असतानाही बळीराजाचे बैलांसोबत पूर्वापार चालत आलेले अनोखे नाते कधीही लुप्त होणार नाही. शेतकरी व बैल यांच्यातील हा स्नेहांकीत बंध असाच कायम राहील. सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा, असं पवार यांनी म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.