पाच टर्मपासून भाजपाचा वरचष्मा!

0

जळगाव लोकसभा मतदारसंघ : विरोधकही शह देण्याच्या तयारीत
जळगाव ;– पुर्वीचा एरंडोल लोकसभा मतदार संघाची जळगाव मतदारसंघ अशी निर्मिती झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आपली मोट बांधली असून गेल्या पाच टर्मपासून भाजपाचा या मतदार संघावर वरचष्मा कायम आहे. एरंडोल मतदारसंघातून विजयी झालेले एम.के.अण्णा पाटील यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देण्यात आले होते.

आगामी निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांसमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण भाजपने आतापर्यंत मोदींच्याच करिश्म्यामुळे सलग दोनदा बहुमताने विजय मिळवला आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार जळगाव व रावेर हे मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असून तेथे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाची एकहाती सत्ता आहे. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांनीही कंबर कसली असून ते भाजपा उमेदवाराला शह देण्यासाठी सक्षम उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीच्या निर्णयानुसार रावेर जागा राष्ट्रवादीला तर जळगावची जागा शिवसेना (ठाकरे) यांना सोडण्यात येणार आहे.
विरोधक मोट बांधण्यात मग्न
भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उबाठा) व काँग्रेसकडून केला जात आहे. जनतेच्या प्रश्नावर सध्या महाविकास आघाडी आवाज उठवित असून विरोधक मोट बांधण्यात मग्न असल्याचे दिसून येते. तूर्त या आघाडीत कुठलेही मानापान नाट्य नसले तरी पडद्यामागे काही हालचाली मात्र घडत आहेत.
भाजपाचा चढता आलेख…
1999 मध्ये वाय.जी. महाजन 47.62 टक्क्यांनी विजयी झाले, त्यानंतर 2004 साली पुन्हा वाय.जी.महाजन 48.44 टक्क्यांनी विजयी झाले. 2009 मध्ये राष्ट्रवादीचे ए.टी. नाना पाटील यांना भाजपात घेवून उमेदवारी दिली. त्यांनी विजयात मोठी आघाडी घेत 52.34 टक्क्यांवर विजय संपादन केला. त्या पाठोपाठ 2014 मध्ये पुन्हा त्यांना मैदानात उतरविण्यात आले होते. मोदी लाटेमुळे त्यांनी तब्बल 65.41 टक्क्यांनी विजय मिळविला. ए.टी. पाटलांच्या कथित व्हिडीओ क्लिपमुळे ते अडचणीत आले आणि चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना भाजपाने पुढे करीत 65.60 टक्क्यांनी विजय मिळविला. भाजपाने या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवत विजयाचा आलेख उंचावत ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.