मद्यधुंद टोळक्याने केली रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना मारहाण

0

जळगाव : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने रस्त्याने जात असलेल्यांसोबत हुज्जत घालून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. या वेळी तेथे असलेल्या एका हॉटेलमध्ये ही त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काव्य रत्नावली चौकात घडली. या घटनेमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

शहरातील काव्य रत्नावली चौकात सायंकाळच्या सुमारास अबालवृद्धांसह तरुण मोठ्या संख्येने बसलेले असतात. तसेच त्याठिकाणी काही बँक असून हॉटेल देखील आहेत. बुधवारी सायंकाळच्या सुमारास तेथील हॉटेल नैवेद्यजवळ काही तरुण मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालीत होते. यावेळी तेथून जाणाऱ्या तरुणींसह नागरिकांना त्यांनी शिवीगाळ करीत त्यांच्यासोबत हुज्जत देखील घातली. दरम्यान, काही नागरिकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण देखील केली. हा वाद सुरु असतांना हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्यांच्या दिशेने ते टोळके आले. त्यांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांना हॉटेल चालकांनी अडविले. यावेळी त्यांना देखील त्या मद्यधुंद टोळक्याने शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काव्य रत्नावली चौकात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानासमोर मद्यपी तरुण धिंगाणा घालीत त्यांनी काहींना विनाकारण मारहाण केली. यामध्ये आशिष जोशी, राहुल जोशी व विवेक जोशी हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. परंतु तो पर्यंत मद्यपी तरुण तेथून पसार झाले होते. याठिकाणाहून पोलिसाीन त्या मद्यधुंद तरुणाची दुचाकी जप्त केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.