ए.टी.नाना पाटील असू शकतात सेनेचे उमेदवार?

0

ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी : सामाजिक समीकरणावर भर!
जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारेच पक्ष मोर्चेबांधणीत व्यस्त झाले असून भाजपाच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी विरोध एकत्र आले असून पूर्वाक्षमीचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा भाजपाचे माजी खासदार ए.टी. नाना पाटील यांना शिवसेना (उबाठा) गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. ए.टी. पाटील भाजपाच्या तिकिटावर दोन वेळा विजयी झाले असून मराठा समाजात त्यांचे प्राबल्य देखील आहे. सामाजिक समीकरणाचा विचार करता श्री. पाटील यांचा प्राधान्याने विचार होवू शकतो.

महाविकास आघाडीच्या निणर्यानुसार जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) गटाला देण्यास तयारी दाखविली असून शिवसेना (उबाठा) उमेदवारांची चाचपणी करीत असून जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, गुलाबराव वाघ, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील व माजी खासदार ए.टी. नाना पाटील यांच्या नावावर खल सुरु आहे. मा. खा. पाटील हे सध्या भाजपात असले तरी ते कुठेही सक्रिय नाहीत. श्री. पाटील यांना शिवसेना (उबाठा)त प्रवेश देवून त्यांना उमेदवारी देण्यासाठी पक्ष नेतृत्व विचार करीत असून तशा हालचाली देखील सुरु झाल्या आहेत.

पाटील देवू शकतात शह…
ए.टी. पाटील हे दोन वेळा खासदार राहिले असून त्यांच्या जनसंपर्क दांडगा आहे. सामाजिक समीकरणांचा विचार करता या मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व असून त्याचा फायदा त्यांना होवू शकतो. खासदारकीच्या काळात त्यांनी केलेल्या विकासकामांची यादीही मोठी आहे. मध्यंतरी त्यांच्याबद्दल एक व्हिडीओ क्लिप व्हायलर झाल्याने ते अडचणीत आले होते. तो विषय जवळपास संपुष्टात आल्याने त्यांचे पुन्हा आगमन होण्याची शक्यता असून ते भाजपाला शह देवू शकतात असे शिवसेना (उबाठा)ला वाटत आहे.

संपर्क प्रमुखांवर जबाबदारी!
शिवसेना (उबाठा) गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी असून उमेदवारांचा शोध ते घेत असून माजी खासदार ए.टी. नाना पाटील यांना गळाला लावण्यासाठी ते प्रयत्नांची शर्त करीत असल्याचे कळते. माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, गुलाबराव वाघ यांची नावे देखील आघाडीवर असून त्यावर खल सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.