नोकरीचे आमिष देत तरुणाची 2.58 लाखात फसवणूक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. याच गोष्टींचा फायदा घेऊन भरघोस पगाराचे आमिष देवून मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. याच पाश्वभूमीवर अ‍ॅमेझॉन कंपनीत पार्ट टाईम जॉब देण्याच्या आमिषाने मुंबईतील 34 वर्षीय बेरोजगार तरुणाची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नोकरीच्या नादात तरुणाने 2.58 लाख रुपये गमावल्याची माहिती आहे.

अ‍ॅमेझॉनची विक्री वाढवण्यासाठी तरुणाला उत्पादनं विकत घ्यावी लागणार होती, त्या बदल्यात, प्रत्येक विक्रीवर त्याला भरघोस कमिशन मिळण्याचं आश्वासन सायबर गुन्हेगारांकडून देण्यात आलं होतं. एकदा कमिशन मिळाल्यावर ऑर्डर रद्द करुन त्याचे पैसे परत मिळवू शकतो, असंही आरोपींनी त्याला सांगितलं होतं.

तक्रारदाराने 6 सप्टेंबर रोजी मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्याच्या तक्रारीमध्ये त्याने म्हटले आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला काम मिळत नव्हते. त्याची पत्नी एका खाजगी कंपनीत नोकरी करते. तो हताशपणे नोकरीच्या शोधात होता, तेव्हा त्याच्या फोनवर एक एसएमएस आला. यामध्ये त्या अॅमेझॉनसाठी काम करण्याची ऑफर देण्यात आली होती आणि पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी त्याला मोबाईल नंबर देण्यात आला होता.

तरुणाने संबंधित क्रमांकावर फोन केला, तेव्हा एका खाजगी कंपनीचा कर्मचारी असल्याचं भासवून सायबर-गुन्हेगाराने त्याच्याशी संवाद साधला. अमेझॉनवर  उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी अमेझॉनशी भागीदारी केलेल्या कंपनीसाठी आपण काम करतो, अशी थाप त्याने ठोकली होती. आरोपीने त्याला सांगितले की, अॅमेझॉनच्या उत्पादनांची विक्री वाढवण्यास मदत करून तो कमिशनद्वारे दररोज 8,000 रुपये कमवू शकतो. यासाठी प्रथम त्याला दिलेल्या ई-वॉलेट खात्यात पैसे भरून एखादे उत्पादन खरेदी करावे लागेल आणि लवकरच त्याला त्यासाठी कमिशन मिळेल. फसवणूक करणाऱ्यांनी त्याला दिलेल्या ई-वॉलेट खात्यात 200, 1,000 आणि 3,000 रुपयांची रक्कम गुंतवण्यास सांगितलं आणि तक्रारदाराचा विश्वास जिंकण्यासाठी ही छोटी गुंतवणूक केल्यानंतर कमिशन म्हणून त्याच्या खात्यात अनुक्रमे 118, 468 आणि 1400 रुपये जमा केले होते.

त्याचा विश्वास जिंकल्यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी त्याला आठ उत्पादनांवर मोठं कमिशन मिळवण्यासाठी ऑर्डर देण्यास सांगितले. तक्रारदार आमिषाला आमिषाला बळी पडला आणि त्याने आठ उत्पादनांसाठी एकूण 2.58 लाख रुपये जमा केले. परंतु त्याला कोणतेही कमिशन मिळाले नाही. जेव्हा त्याने आरोपींना फोन केला, तेव्हा त्यांनी पैसे परत करण्यास नकार दिला आणि कॉल कट केला. तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे समजले आणि त्याने अंधेरी पोलिसांशी संपर्क साधला.

दरम्यान, बोरिवलीतील 37 वर्षीय गृहिणीनेही अशाचप्रकारे सायबर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या आमिषाला बळी पडून 2.33 लाख रुपये गमावले. तिलाही अॅमेझॉनसाठी घरातून काम करण्याचे खोटे मेसेज पाठवण्यात आले होते. तिला असेही सांगण्यात आले होते की अॅमेझॉनची उत्पादन खरेदी करण्यासाठी सुरुवातीला पैसे गुंतवावे लागतील आणि त्याचे रेटिंग वाढवावे लागेल ज्यासाठी तिला कमिशन मिळेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.