परमबीर सिंह यांची भाजपसोबत ‘डील’ ; नवाब मलिकांचा आरोप

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करुन हीरेन हत्या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचे काम केलं. जेव्हा NIA केव्हाही अटक करु शकते, अशी भीती निर्माण झाल्यावर परमबीर सिंह यांनी भाजपसोबत ‘डील’ केल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

NIA च्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे नमूद असल्याचे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्याचं काम केलं. त्या ‘डील’ मुळे NIA ने परमबीर सिंह यांना आरोपी केलेलं नाही असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र आता भाजप NIA ला अधिकार आहेत कुणाला आरोपी करायचं आणि कुणाला नाही हे सांगत आहेत हे एकदम हास्यास्पद असल्याचा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या माध्यमातून अनिल देशमुख यांच्या विरोधात घटनाक्रम घडवण्यात आला. परमबीर यांना वाचवण्यासाठी एनआयएने त्यांना आश्वाासित केले. त्यामुळे एनआयएच्या आरोपपत्रात सिंह यांना आरोपी करण्यात आले नाही. त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान भाजपच्या माध्यमातून झाले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला आहे.

एनआयएने जे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये सायबर तज्ज्ञांच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी ५ लाख रुपये परमबीर सिंह यांनी दिले होते, असे सायबर तज्ज्ञाने सांगितले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. एनआयएच्या आरोपपत्रात जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली नाही. त्यांना आरोपी करण्यात आले नाही. खंडणीसाठी हे कटकारस्थान सचिन वाझेने केले आहे. त्यात पूर्ण सत्य आहे असे आमचे मत नाही. बरेचसे काही यातून बाहेर येऊ शकत होते. परंतु एनआयएने तसा काही तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्यासाठी काम केले आहे. परमबीर यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान दिल्याचा गंभीर आरोपही मलिक यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.