छगन भुजबळांना दिलासा.. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. छगन भुजबळ यांच्यासह सहा आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त ठरवलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार असून दोषमुक्त करावं, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, आज न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केलं आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात पुरावे असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला होता. त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करु नये असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटलं होतं. दरम्यान, आपल्याविरोधात ठोस पुरावे नसल्याचा दावा करत भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर यांनी प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला होता. भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय देत, छगन भुजबळांना मुक्त केलं. या प्रकरणात यापूर्वी ५ जणांना दोषमुक्त करण्यात आलं आहे. तेव्हा ACB ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. विकासक चमणकर कुटुंबियांतील चौघांसह एका पीडब्ल्यूडी अभियंत्याचा यामध्ये समावेश होता. मात्र आज छगन भुजबळांचं नावही या प्रकरणातून वगळण्यात आलं आहे

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपांवरून छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. छगन भुजबळ १४ मार्च २०१६ पासून मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये होते. त्यांना उच्च न्यायालयाने दोन वर्षांनी म्हणजे ४ मे २०१८ रोजी जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयानं PMLA कायद्याचं ४५ (१) हे कलम रद्द केल्याने, भुजबळांना जामीन मंजूर झाला होता.

भुजबळांनी पत्रकार परिषदेत म्हटले की,  त्यांच्यावर खोटेनाटे आरोप लावण्यात आले होते. त्यांच्याविरोधात जोरात मीडिया ट्रायल चालवण्यात आली आणि सव्वा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ आपल्याला तुरुंगात राहावे लागले. मात्र वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास सत्य आणून दिले, ज्यामुळे आमची निर्दोष मुक्तता झाली. भुजबळ या पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही.’

 

Leave A Reply

Your email address will not be published.