जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाचा मोबाईल लंपास करणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी रात्री ९ वाजता नशिराबाद येथून अटक केली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम मुकेश करोसिया (वय २१, रा. भवानी नगर नशिराबाद ता. जि.जळगाव) आणि राजेंद्र सुकलाल भोई (वय २०, रा. निमजाई माता मंदीर नगर नशिराबाद ता.जि.जळगाव) हे अटक केलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.
सोनाजी अशोक मिरगे (वय ३०, रा. रहमेबाद ता. सिल्लोड जि. औरंगाबाद) हे ट्रक चालक आहे. त्यांच्याकडे सतपाल शर्मा यांच्या मालकीचा ट्रक (एमएच ४६ एफ ५३४५)वर चालक म्हणून काम करतात. ५ जून रोजी रात्री ८.३० वाजता सोनाजी मिरगे यांनी तालुक्यातील चिंचोली येथील गोडावून मधून रिकाम्या बाटल्यांचा माल घेवून ट्रकने औरंगाबाद येथे जात असतांना उमाळा घाटात रात्री ११.३० वाजेच्या सुमारास चार जण दुचाकीवरून येवून ट्रकच्या समोर उभी केली.
त्यावेळी ट्रकचालकाने ट्रक थांबविला. चाकूचा धाक दाखवून पैसे दे असे सांगितले. मात्र आपल्याकडे पैसे नसल्याचे ट्रक चालकाने सांगितले. ट्रक चालकाच्या खिश्यातील ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून चौघे एकाच दुचाकीने पसार झाले. ट्रक चालकांने दुचाकीचा पाठला गेला त्यावेळी त्यांना दुचाकीचा क्रमांक (एमएच १९ डीए १२८३) असल्याचे लक्षात ठेवले.
ट्रक चालक सोनाजी मिरगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दुचाकीच्या क्रमांकावरून दोन संशयित आरोपी हे नशिबराद येथील असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार संशयित आरोपी राम मुकेश करोसिया आणि राजेंद्र सुकलाल भोई यांना गुरूवारी रात्री ९ वाजता राहत्या घरातून अटक केली आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे.