केंद्र सरकार कुणावरही आकसाने कारवाई करत नसून कुणी तरी काळेबेरे केले असेल – बावनकुळे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माजी मंत्री तथा भाजप युवा मोर्चाचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे  आज जिल्हा दौर्‍यावर आले असतांना पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकार कुणावरही आकसाने कारवाई करत नसून कुणी तरी काळेबेरे केले असेल म्हणूनच ईडीवर कारवाई होत असल्याचे सांगत  बावनकुळे यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता टोला लगावला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमिवर भारतीय जनता पक्षातर्फे युवा वॉरियर्स जोडणीची मोहिम सुरू करण्यात आली असून यातून राज्यभरात २५ लाख युवकांना जोडण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा भाजप युवा मोर्चाचे प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते येथील पत्रकार परिषद बोलत होते. या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी  बावनकुळे यांनी राज्यातील सत्ताधार्‍यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, पालकमंत्री आपल्या मतदारसंघापुरते, मुख्यमंत्री मुंबईपुरते तर उपमुख्यमंत्री पुण्यापुरतेच मर्यादीत आहेत. जळगावचे पालकमंत्री त्यांच्याच मदतारसंघात फिरत असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या सरकारने गत पंचवार्षिकमध्ये शेतकर्‍यांना अविरतपणे वीज दिली. कुणाचीही जोडणी कापली नाही. एकाही शेतात लाईनमन गेला नाही. ऐन खरीपाच्या वेळेस शेतकर्‍यांची वीज जोडणी कापल्याची बाब ही निषेधार्थ  अशीच आहे. वीज माफिच्या सर्व घोषणा हवेत विरल्याचे ते म्हणाले. आम्ही राज्य लोडशेडींगमुक्त केले होते. मात्र आता लोडशेडींग होत आहे. आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षाचे नेते संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. कुणी म्हणते आघाडी करू तर कुणी म्हणते करणार नाही…हे काय चालले आहे ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले.

तसेच  चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाना पटोले हे स्वबळाच्या घोषणा करत असले तरी धानाबाबत बोलत नाही. संजय राऊत सकाळपासून बोलत असले तरी ते पूरग्रस्त वा शेतकर्‍यांच्या मदतीबाबत बोलत नाही. आज दुष्काळग्रस्त स्थिती असून याकडे पाहण्याची गरज आहे. हे नौंटकी सरकार असल्याचे बावनकुळे म्हणाले. यामुळे राज्यातील जनता ही प्रचंड नाराज आहे. आम्ही युवा वॉरियरच्या मदतीने सरकार स्थापन करणार असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपने कोणत्याही ओबीसी नेत्यावर अन्याय केला नसल्याचे ते म्हणाले. तर ईडी आणि सीबीआयच्या कारवाया आकसाने होत असल्याचा आरोप देखील खोटा आहे. कुणी तरी काही तरी केले असेल म्हणून तर ईडीची कारवाई होत आहे अशा शब्दात त्यांनी एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता टोला लगावला. तर, खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते होते, त्यांनी केलेले काम कुणी नाकारणार नाही. मात्र आमच्या सरकारने त्यांच्या विरोधात कोणताही अन्याय झाला नसल्याचे बावनकुळे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

एकनाथराव खडसे हे आमच्या सर्वांसाठी नेते होते. अगदी फडणवीस हे देखील त्यांना नेते मानत होते. त्यांचा पूर्णपणे आदर करण्यात आला होता. यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असे मानता येणार नाही. जर नाथाभाऊंना राष्ट्रवादीने खूप गाजावाजा करून प्रवेश दिला असला तरी त्यांना मंत्रीमंडळात प्रवेश का दिला नाही ? असा प्रश्‍न बावनकुळे यांनी याप्रसंगी उपस्थित केला. कुणीही नेता सोडून गेला तरी भाजपला काहीही फरक पडत नसल्याचे बावनकुळे यांनी याप्रसंगी ठणकावून सांगितले. जळगावातील नगरसेवक पक्ष सोडून गेले असले तरी जनता मात्र आम्हाला सोडून गेली नाही. बंडखोरांना जनता धडा शिकवले असा इशारा त्यांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.