आ. सावकारेंच्या वाढदिवस सोहळ्यात रा.काँ.चे वर्चस्व!

0

भुसावळचे आमदार संजय सावकारे हे जरी भाजपचे असले तरी त्यांचेवर राष्ट्रवादी काँग्रेस विशेष राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा विशेष पगडा आहे. पक्षांतर कायद्याची जर अडचण नसती आणि पक्षांतर केल्यानंतर आमदारकीवर गदा आली नसती तर संजय सावकारे, एकनाथराव खडसे यांनी भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी आ. सावकारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता असे भुसावळ तालुक्यासह जिल्ह्यातील जनतेत बोलले जाते.

शनिवार दि. 11 रोजी आ. सावकारे यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यांनी वाढदिवसावर कसली जाहीरातबाजी, बॅनरमाजी आदींवर खर्च न करता मतदार संघात केलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण, करावयाच्या विकास कामांचे भूमिपूजन, वृध्द गरीब महिलांना साड्या वाटप, भुसावळ शहरात काही प्रमुख चौकात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी दिवसभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यानंतर रात्री 8 वाजता भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील स्टार लॉजमध्ये सावकारे मित्र मंडळीच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

आमदार सावकारे हे भाजपचे असतांना जिल्ह्यातील भाजप नेते व कार्यकर्त्यांपेक्षा जास्त मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. प्रामुख्याने भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती हे होय. त्यांचेबरोबर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते सुध्दा उपस्थित होते. नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक प्रा. सुनील नेवे हे जरी भाजपचे असले तरी त्यांचे कुटुंबियांनी यापूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे ते नावासाठी भाजपा आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचेच आहेत. वाढदिवस सोहळ्याच्या व्यासपीठावर खडसेंसह देवेंद्र वाणी, राजेश वानखेडे, भुसावळचे प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते.

आ. संजय सावकारे मित्रमंडळींच्या वतीने हा वाढदिवस सोहळा साजरा करण्यात येत असल्याने मित्रमंडळींमध्ये कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असू शकतात. कारण राजकारणाव्यतिरीक्त मैत्रीचं नात वेगळं असू शकतं. त्यामुळे आ. संजय सावकारे भाजपचे असले तरी भाजपच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले नव्हते. म्हणून भाजपला आ. सावकारे विषयी बोलण्याचा अधिकार नाही. त्यामुळे भुसावळच्या स्टार लॉजमध्ये झालेल्या आ. संजय सावकारेंच्या या वाढदिवस सोहळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व होते. त्यामुळे आ.संजय सावकारे भाजपचे की राष्ट्रवादीचे? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.

आ. संजय सावकारे यांची भुसावळ विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्याची ही तिसरी टर्म आहे. 2009 ची विधानसभा निवडणूक आ. सावकारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लढविली होती. त्या पाच वर्षात शेवटी शेवटी ते राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फेच राज्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री झाले होते. त्यानंतर 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर आमदारकी लढविली आणि ते निवडूनही आले. भाजपतर्फे भुसावळ विधानसभा मतदार संघातून उमेदवारी  एकनाथराव खडसे यांच्याच पुढाकाराने देण्यात आली होती.  राष्ट्रवादीऐवजी भाजपतर्फे निवडणूक लढवित असतांना आ. सावकारेंनी झेंडा कुठलाही असला तर समाजसेवा, देशसेवा महत्वाची आहे असे पत्रक प्रसिध्द केले होते.

14 ते 2019 पर्यंत पाच वर्षे सावकारे भाजपचे आमदार होते. 2019 ला एकनाथराव खडसे यांचे भाजपतर्फे तिकीट कापले गेले परंतु आ. सावकारेंना भुसावळ मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी दिली गेली. सावकारे निवडूनही आले. तथापि सावकारेंचे गॉडफादर एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आ. सावकारेंची फार मोठी पंचाईत झाली. पक्षांतर कायदा नसता तर आ. सावकारे राष्ट्रवादीत गेले असते असे म्हटले जाते. त्यात तथ्यांश असल्याचे आता दिसून येत आहे. भुसावळ शहर तसेच तालुक्यावर एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व आहे. भुसावळ नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळेसह भाजपचे बहुमत आणण्यात एकनाथराव खडसे यांचाच सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भुसावळ पालिकेत आजही एकनाथराव खडसे यांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे भुसावळ पालिकेतील नगराध्यक्षांसह सर्व भाजप नगरसेवकांचे कुटुंबीय जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

भाजपला हा फार मोठा धक्का देणारा निर्णय होता. तथापि जिल्हा भाजपतर्फे कोणतीही कारवाई केली गेली नाही ते करणे शक्यही नव्हते. नुकतीच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण 21 जागांपैकी 20 जागांवर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलने उमेदवार निवडून आले. त्यापैकी 11 उमेदवारांचे तर बिनविरोध निवड झाली. भाजपतर्फे बहिष्कार टाकून या निवडणुकीतून माघार घेतली होती. भाजपतर्फे एकही उमेदवार निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती.

तथापि भुसावळचे आमदार भाजपचे त्यांनी भाजपचा आदेश धुडकावून अपक्ष उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढविली आणि ते निवडूनही आले. एकनाथराव खडसेयांच्या आशिर्वादानेच ते निवडून आले. मात्र तीळमात्र शंका घेण्याचे कारण नाही. त्यामुळे आ. संजय सावकारे यांचा वाढदिवस सोहळा राष्ट्रवादीचे हायजॅक केला म्हटलं तर ती अतिशोक्ती ठरणार नाही. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून एकनाथराव खडसे यांनी वाढदिवसानिमित्त कापलेला केक आ. सावकारेंना भरला. एवढेच नव्हे तर याप्रसंगी बोलतांना आ. संजय सावकारेंची तोंड भरून स्तुती केली. डिसेंबर महिन्यात शरद पवार, गोपीनाथ मुंडे आदी दिग्गजांचे वाढदिवस आहेत. तुम्हाला सुध्दा मोठे भविष्य असल्याच्या शुभेच्छा खडसेंनी दिल्या. यात सर्व काही आले.

Leave A Reply

Your email address will not be published.