धक्कादायक.. भरदिवसा तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

0

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

उपराजधानीच्या मध्य भागातून एका तरुणीचे (वय १९) अपहरण करून तिला कळमन्यात नेल्यानंतर दोन आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

तिला निर्जन भागात सोडून आरोपी पळून गेले. पीडित तरुणी दुपारी १२ च्या सुमारास कळमना ठाण्यात पोहचल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर शहरात एकच खळबळ निर्माण झाली.

पीडित तरुणी फेटरी मार्गावरील रहिवासी आहे. ती बीए प्रथम वर्गाची विद्यार्थिनी आहे. संगीताचे धडे घेण्यासाठी रोज रामदास पेठेतील एका इमारतीत जात होती. नेहमीप्रमाणे सोमवारी ती बसने सीताबर्डीत उतरली. तेथून ती पायी चालत रामदास पेठेत आली.

सकाळी ९ वाजताच्या सुमारास ती दगडी पार्कजवळून जात असताना तिच्याजवळ एक कार (व्हॅन) थांबली. बुटीबोरीकडे कुठून जावे लागते, असे विचारून तिला एकाने जवळ बोलविले आणि दुसऱ्या एका तरुणाने तिला कारमध्ये कोंबले. आरोपींनी तिला कारमध्ये मारहाण करून तोंडावर कापड बांधल्यानंतर कळमन्यात नेले. चिखली ते डिप्टी सिग्नल भागात निर्जन परिसरात नेऊन जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

आरोपी पळून गेल्यानंतर पीडित तरुणी तेथून पायी चालत एका टाईल्सच्या दुकानात पोहचली. दुकानदाराला तिने हा कोणता एरिया आहे, असे विचारले. त्यानंतर तेथून फोन करून तिने आपल्या आईला आणि एका मित्राला माहिती देत बोलवून घेतले. त्यानंतर मित्रासह ती कळमना ठाण्यात पोहचली. तरुणीने सामूहिक बलात्काराची माहिती देताच पोलीस दल हादरले. तिची विचारपूस करतानाच ठाणेदार विनोद पाटील यांनी वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली.

 

माहिती कळताच उपायुक्त मनीष कलवानिया कळमन्यात पोहचले. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त विनिता साहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सीताबर्डी ठाण्यात पोहचले. तिकडे कळमन्यात विचारपूस केल्यानंतर तरुणीची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. दरम्यान, रात्रीपर्यंत कळमन्यातील नेमके घटनास्थळ आणि आरोपी स्पष्ट झाले नव्हते.

पीडित तरूणी गोंधळल्यासारखी झाल्याने नीट माहिती देत नव्हती. घटनास्थळाची सुरूवात सीताबर्डीच्या दगडी पार्कमधून झाल्याने ठाणेदार अतुल सबनीस आणि सहकाऱ्यांनी मुनलाईटपासून पंचशील चाैक ते दगडी पार्क परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. दगडी पार्कजवळ अनेकांना विचारपूस केली.

या खळबळजनक घटनेमुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तपासात अडथळा निर्माण होण्याची सबब पुढे करून कुणीही अधिकृत माहिती देत नव्हते. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी आरोपींना शोधून काढण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असून त्यासाठी कळमना, सीताबर्डी तसेच गुन्हे शाखेची अनेक पथके आरोपीच्या शोधासाठी कामी लावण्यात आल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.