आता अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी  लावली आहे. मागील दोन दिवसांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तर पावसाने कहर केला आहे. काल दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे राज्यात 21 जणांचा बळी गेला आहे. तसेच शेतात पाणी साचल्याने राज्यातील अनेक शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. असं असूनही राज्यातील अस्मानी संकटं कमी होत नाहीय. बंगालच्या उपसागरानंतर आता अरबी समुद्रात देखील चक्रीवादळाचा धोका  निर्माण झाला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र वेगाने दक्षिण गुजरात आणि खंबातचे आखाताच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे उद्या पहाटेपर्यंत अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे क्षेत्र पश्चिम-उत्तरेकडे सरकून अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सुदैवाची बाब म्हणजे चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीपासून पाकिस्तान-मकरान किनारपट्टीच्या दिशेने प्रवास करेल. असं असलं तरी याचा परिणाम म्हणून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून जारी केलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा आहे. नाशिक आणि पालघर या दोन जिल्ह्यांत आज पावसाचा सर्वाधिक जोर असण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दोन्ही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.  देशात सर्वाधिक लसीकरण करूनही यूपी पिछाडीवर दुसरीकडे, आज मुंबईसह, पुणे, रायगड, ठाणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या बारा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान वाऱ्यांचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यात कमी अधिक फरकाने अशीच स्थिती राहणार आहे. पण विदर्भात पावसाचा जोर कमी होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.