अध्यक्ष डॉ. नारळीकरांसह तिन्ही मान्यवरांविनाच होणार साहित्य संमेलन

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नाशिक येथे होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असली तरी एक महत्त्वाची बातमी समोर आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाला अनुपस्थित राहणार आहेत.तसेच मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो हे सुद्धा अनुपस्थित राहणार आहेत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा संमेलनाला येऊ शकणार नाहीत.

मोठ्या उत्साहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी केली जात आहे.  भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात हे संमेलन होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांची उपस्थिती या संमेलनाचे आकर्षण आहे. मात्र, ९४व्या या संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाला येऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कुटुंबाची प्रकृती आणि सध्याचे वातावरण यामुळे डॉ. नारळीकर यांनी येण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे त्यांचे अध्यक्षीय भाषण संमेलनात वाचून दाखविले जाणार की त्यांची व्हिडिओफीत दाखविली जाणार याबाबत उत्सुकता आहे.

तर, डॉ. जयंत नारळीकर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यासाठी मावळते संमेलन अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो हे सुद्धा गैरहजर राहणार असल्याचे समोर आले आहे. दिब्रेटो यांचीही प्रकृती ठीक नसल्याने त्यांनीही उपस्थितीविषयी नकार कळविला आहे.

त्याचबरोबर या संमलेनाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्यांना कालच डिस्चार्ज देणार आला आहे. त्यामुळे ते वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. परिणामी, प्रकृतीच्या कारणावरुन ते संमेलनाला येणार नाहीत. मात्र, ते ऑनलाईन पद्धतीने संमेलनाला हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.