अजित पवारांना मोठा धक्का; निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. महत्वाचे हे सर्व म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे निकटवर्तीय असल्याचे पुढे येत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर, अंबालिका शुगर, जरंडेश्वर, पुष्पदनतेश्वर शुगर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मोठी झडती करण्यात येत आहे. आयकर विभागाने सुरु केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

या संदर्भात त्यांनी काही कागदपत्रेही आयकर विभाग आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. नुकतीच किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याला भेट दिली होती. या साखर कारखान्याचा लिलाव चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. ही छापेमारी पुणे जिल्ह्यातील दौंड परिसर, कर्जत, नंदुरबार परिसरात सुरू आहे. या छापेमारी दरम्यान इन्कम टॅक्स विभागाने सीआरपीएफच्या जवानांची सुद्धा सुरक्षेसाठी मदत घेतली आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित दौंड शुगर, अंबालिका, नांदूरमधमेश्वर, जरंडेश्वर या कारखान्याची संबंधित संचालकांवर आयकर खात्याने आज सकाळी छापे मारले. यांच्यासह राज्यातील विविध औद्योगिक कंपन्यांवरील छापे टाकले आहेत. मात्र यातील महत्त्वाची बाब अशी की अजित दादांच्या बहिणीच्या घरी ही छापेमारी करण्यात आली. याची माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी अजित पवार म्हणाले, धाड राजकीय हेतूने असेल तर याचा विचार केला पाहिजे. मी कधीही करचुकवेगिरी केली नाही. नातेवाईक म्हणून जर आमच्या बहिणीच्या घरावर धाड टाकली जात असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार करावा. सरकार येतात आणि जातात परंतु अशा प्रकारचे राजकारण खालच्या स्तरावर जाऊन केलेले राजकारण असे याच्या आधी कधीही केले गेलेले नाही. राज्यातील राजकारणाची पातळी घसरत चालली आहे.

कोठे छापे मारायचे हे आयकर खात्याचे अधिकार आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या कंपनीशी संबंधित ठिकाणी छापे टाकले आहेत त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. मात्र चाळीस वर्षांपूर्वी लग्न होऊन आपल्या घरी गेलेल्या बहिणीच्या घरी देखील छापेमारी केली जात असेल तर मात्र राज्याच्या जनतेने याचा विचार करावा असे अजित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.