अकरावी प्रवेशाची चिंता दूर; शिक्षण विभागाकडून मोबाईल ॲपची निर्मिती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

27 ऑगस्टला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक अ‌ॅप तयार केलं आहे. POEAM असं या अ‌ॅपचं नाव आहे. विद्यार्थी या ॲपचा वापर करुन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकते, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी आता POEAM या मोबाईल अ‌ॅपचा वापर करु शकतात. विद्यार्थ्यांना हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस वर उपलब्ध होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

 

शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशा विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केलं आहे. पहिल्या गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांनी 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं केली जाते.

कोरोना विषाणू ससंर्गामुळं महाराष्ट्र सरकारनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पर्यायी मूल्यांकन धोरणानुसार बोर्डानं निकाल जाहीर केले होते. या निकालामध्ये उत्तीर्ण न झालेले विद्यार्थी आणि ए.टी.के.टी साठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं यांसदर्भातील तारखा जाहीर केल्या आहेत.

बोर्डानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा बुधवारी 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी यासंदर्भात त्यांच्या शाळेशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या सर्वसाधारण अभ्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल. या शिवाय बारावीच्या व्यवसाय अब्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.