राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

राज्याच्या बहुतांश भागात ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली. गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत पावसाला सुरवात झाली. हा पाऊस फारकाळ टिकला नसला, तरी पाण्याअभावी अडचणीत सापडलेल्या खरिपाला जीवदान मिळाले. पुढील आठवडाभरात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात चांगल्या पावसाचे संकेत आहेत. कोकण आणि विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

सातत्याने पडणारे खंड कमी कालावधीत होणारा जोरदार पाऊस आणि असमान वितरण हे यंदाच्या मॉन्सून हंगामाचे वैशिष्ट्य ठरले आहे. ऑगस्टमध्ये अपुऱ्या पावसाने तर चिंतेत आणखीन भर घातली आहे. आता मॉन्सूनच्या उर्वरित हंगामात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. मागील आठवड्यात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर पूर्व विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मात्र सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस पडला.

हवामान खात्याने पुढील दोन आठवड्यांत पडणाऱ्या पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

तर दुसऱ्या आठवड्यात ३ ते ९ सप्टेंबर या दरम्यान उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या दक्षिण भागात मात्र पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.