बापरे ! कैद्याने 26 लाखांचा केला मनीऑर्डर घोटाळा

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सचिन रघुनाथ फुलसुंदर या कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यांच्या हुबेहूब बनावट सह्या आणि मनीऑर्डर रजिस्टरमध्ये खोटे दिनांक, हिशेब लिहीत तब्बल 26 लाख 69 हजार रुपये लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अधिकाऱ्यांच्या हुबेहूब खोट्या सह्या

मिळालेल्या माहितीनुसार सचिन फुलसुंदर हा कैदी सन २००६ मधील बलात्कार व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील आरोपी असून फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2023 यादरम्यान त्याने कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांची नजर चुकवून कारखाना विभागात होणाऱ्या वस्तू बाहेर पाठवण्याच्या मदतीचा बहाणा केला. या विभागात वारंवार येऊन त्याने तेथील अधिकारी व कर्मचारी यांचा विश्वास संपादन केला. येरवडा कारागृह येथील कैद्यांना त्यांच्या नातेवाइकांनी केलेल्या मनीऑर्डरची नोंद ठेवल्या जाणाऱ्या २ ए रजिस्टरमध्ये क्रमांक एक ते सहामध्ये त्याने फेरफार केला. कारागृह अधिकाऱ्यांच्या हुबेहूब खोट्या सह्या, दिनांक, खोटे हिशेब तयार करून किरकोळ रकमा स्वत:चे व इतर कैद्यांचे नावे दाखवल्या आणि सदर रक्कम परस्पर वापरून एकूण अंदाजे २६ लाख ६९ हजार ९११ रुपयांचा अपहार केला.

 

१४ वर्षापासून कारागृहात बंदीस्त

सचिन फुलसुंदर हा १४ वर्षापासून कारागृहात बंदीस्त असल्याने तो कामानिमित्त मेनगेटवर येत असल्याने मेनगेटमधील कर्मचारी त्यास अडवत नसे. या संधीचा फायदा घेऊन व कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करुन शिक्षाबंदी फुलसुदंर हा न्याय विभागात येऊन संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांच्या ताब्यात असलेले २ ए रजिस्टर हाताळत असे. कर्मचाऱ्यांची नजर चुकवून अधिकारी ज्याप्रमाणे बंदी यांच्या नातेवाईकांनी पाठविलेल्या मनिऑर्डरच्या रजिस्ट्ररमध्ये नोंदी घेतात, त्याप्रमाणे तो हुबेहुब खोटी दिनांक, खोटी स्वाक्षरी व खोटी रक्कम नोंद करत असे तसेच खोटे हिशोब तयार करायचा. अनेक वेळा तो सर्कल क्रमांक-१०३ येथे २ ए रजिस्टर घेऊन जाऊन तेथे खोटी दिनांक, खोटी स्वाक्षरी, व रक्कमा नोंद करुन परत रजिस्टर न्यायविभागात आणून ठेवत होता.

पोलिसांकडे फिर्याद दाखल

सचिन रघुनाथ फुलसुदंर हा नारायणगांव पोलीस स्टेशन येथील बलात्कार गुन्ह्यातील आरोपी आहे. तो सन २००६ पासून कारागृहात दाखल असून त्यास काम वाटप कमिटीने कारखाना विभाग येथे साफसफाईचे काम दिले होते. त्यानुसार शिक्षाबंदी फुलसुदंर हा साफसफाईचे काम करत असताना शिक्षा बंदींचे खाजगी रक्कमेचे २ ए रजिस्टर मध्ये खोटया मनिऑर्डर फेरफार करत असल्याचे गोपनीय माहिती कारागृह प्रशासनास मिळाली होती. याबाबत येरवडा कारागृह तुरुंगाधिकरी बापुराव भिमराव मोटे यांनी सचिन फुलसुंदर विरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.