यावलमध्ये सोशल मीडिया पोस्टवरून वाद; जमावावर पोलिसांचा सौम्य लाठीमार

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोशल मीडियावरील पोस्टमुळे शहरात दोन समाजात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या वादाचे पडसाद मंगळवारी रात्री जमावात रूपांतरित झाल्याने पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. शहरात सध्या शांतता प्रस्थापित असून पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.

यावल शहरात एका समाजाच्या भावना दुखावणारी पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची तक्रार करीत असतांना मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणावर जमाव एकत्र होत पोलीस ठाण्याच्या दिशेने येत असताना पोलिसांनी शहरातील बुरूज चौकात जमावाला थांबवत परत जाण्याच्या सूचना केल्या, मात्र जमाव पांगत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यामुळे दि.14 मंगळवारी रात्री शहरात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागाचे डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे हे देखील शहरात दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलीसांचा शहरातील विविध भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला. कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट बाबत वाद सुरू असल्याने याबाबतची एकाकडून एका गटाकडून तक्रारही करण्यात आली होती. मंगळवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने फैजपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व येथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांनी केले आहे.

 शांतता समिती बैठक कागदावर

काल दि.14 रोजी संध्याकाळी 5 वाजता यावल पोलीस स्टेशन कार्यालयात शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीचे आमंत्रण किंवा सूचना शांतता समितीच्या अनेक सदस्यांना न मिळाल्याने शांतता समितीच्या कार्यपद्धतीवरच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही सदस्यांना बोलाविले जात नसल्याने शांतता समिती सदस्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शांतता समितीच्या बैठकीत शहरातील अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत नसल्याने तसेच ठराविक सदस्य आपल्या सोयीनुसार प्राथमिक चर्चा करीत असल्याने शांतता समितीच्या इतर अनेक सदस्यांमध्ये आणि यावल शहरातील नागरिकांमध्ये शांतता समितीबाबत आणि कायदा सुव्यवस्था, जातीय सलोखा याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काल संध्याकाळी शांतता समितीची बैठक झाली. आणि रात्री यावल शहरात शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे याला काय म्हणावे? असे सुद्धा यावल शहरात बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.