नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
आताची सर्वात मोठी बातमी आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून नव्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. याबरोबरच कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झालेले संजय सिंह यांचेही निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह आणि संजय सिंह यांना मोठा धक्का बसला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका काही दिवसांपूर्वीच पार पडल्या होत्या. यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय सिंह यांची निवड झाली होती. मात्र, संजय सिंहांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. तसेच कुस्तीगीर आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने आपले पद्म पुरस्कार परत केले. यामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका झाली. यानंतर मोठा निर्णय घेत थेट नव्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याचा निर्णयच सरकारने घेतला.
तसेच संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगितीही देण्याचा निर्णय घेतला असून पुढील आदेश येईपर्यंत सर्व कामांवर बंदी घालण्यात आली आहे. कुस्ती संघटनेची ही निवडणूक वैध नसल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलं आहे.