जिल्ह्यात वृक्षारोपणाची कामे मिशन मोडवर करा – जिल्हाधिकारी

ग्राम रोजगार सेवकांची शंभर टक्के पदे भरा

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जिल्ह्यात वृक्षारोपणाची कामे मिशन मोडवर करण्याबरोबरच ग्राम रोजगार सेवकांची शंभर टक्के पदे भरण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, मातोश्री पाणंद रस्ते आदी विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी मेघना दाटेकर, मृद संधारण अधिकारी सय्यद साजिद तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात वृक्षारोपणाची कामे नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करण्यासाठी मिशन मोडवर काम करण्यात यावे. रोजगार हमी योजनेत कुशल व कुशल कामांचे योग्य नियोजन करण्यात येऊन कामांना गती देण्यात यावी. जिल्हा परिषद शाळांच्या सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण करण्यात यावे. धरणे गाळमुक्त करण्यासाठी गाळमुक्त धरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत ५२३ कामे मंजूर आहेत‌. या कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रस्ताव सादर करण्यात यावेत. अशा सूचना ही जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.