मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील भाचे आणि जावई देखील असलेले मूळचे नेपानगर मध्य प्रदेश येथील असलेले शहीद जवान विपिन जनार्दन खर्चे (वय 37) यांच्यावर शासकीय इतमामात पोलीस विभागाने दिलेल्या मानवंदनेद्वारे अंतिम संस्कार करण्यात आले.
याप्रसंगी त्यांच्या मातोश्री इंदुबाई खर्चे आणि वीर पत्नी रूपाली खर्चे यांनी सर्वप्रथम पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यात माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी यामिनी चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट अरविंद भैय्या पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष एडवोकेट रोहिणी खडसे खेवलकर, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता एडवोकेट अरविंद गोसावी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भोई, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर , युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, माजी युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, सभापती निवृत्ती पाटील, दशरथ कांडेलकर, रंजना कांडेलकर, राजेंद्र माळी, जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील, पंचायत समिती माजी सभापती विकास पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ईश्वर राहणे, डॉ. बी. सी. महाजन, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष रवींद्र कांडेलकर, महसूल प्रशासनातर्फे तहसीलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक शंकर शेळके, उपविभागीय अधिकारी विवेक सोनवणे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी जळगाव संजय महाजन यांनी तसेच रतिराम महाजन यांनी देखील पुष्पचक्र अर्पण केले. पार्थिव शक्ती स्तरावर ठेवल्यानंतर ध्वज वितरण करण्यात येऊन जळगाव जिल्हा पोलीस दलामार्फत त्यांना अखेरची सलामी देण्यात आली. याप्रसंगी बंदुकीच्या तीन फेरी झाडण्यात आल्या. शेवटी वीर पत्नी रूपाली व त्यांचा चार वर्षाच्या मुलगा यांच्या हस्ते अग्नीडाग देण्यात आला. शहीद जवानाच्या अंतिम संस्कार प्रसंगी स्वर्ग रथ हा सजवण्यात आलेला होता. संपूर्ण गावातील महिलांनी रांगोळ्या काढून स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता सुशोभित केलेला होता. याप्रसंगी सैनिक विभागातर्फे अंत्यविधी मदत म्हणून कुटुंबीयांकडे 89 हजार रुपयांची रोख स्वरूपात मदत सोपवण्यात आली.
अंत्ययात्रेसाठी निमखेडी बुद्रुक, इच्छापुर, मालखेडा, चारठाणा, बोदवड, धामणगाव, कुरा नांदवेल, वाला, चिंचखेडा बुद्रुक, डोलारखेडा या पंचक्रोशी सह मुक्ताईनगर तालुका व जिल्हाभरातून जवळपास 20 हजार नागरिक उपस्थित होते. वीर जवान अमर रहे या घोषणा देत शहीद विपिन खर्चे यांचे पार्थिव पंचतत्वात विलीन झाले.