डॉ. विजय माहेश्वरी यांनी उमविच्या कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारली (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सर्व घटकांची सोबत, संतुलित दृष्टिकोन आणि कामकाजातील पारदर्शकता ही त्रिसुत्री सोबतीला घेत महाराष्ट्र विद्यापीठ कायदा-२०१६ हा धर्मग्रंथ समजून व तोच प्रमाण मानून विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून काम करणार असल्याची ग्वाही  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नवे कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी यांनी दिली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सातवे कुलगुरु म्हणून प्रा. माहेश्वरी यांनी सोमवार दि.७ मार्च, २०२२ रोजी पदभार स्वीकारला. मावळते प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने प्रा. माहेश्वरी यांनी हा पदभार घेतला.  व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात छोटेखानी समारंभात हा पदभार स्वीकारतांना माजी कुलगुरु प्राचार्य के.बी.पाटील, माजी प्राचार्य अनिल राव, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, प्रशाळांचे संचालक उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करतांना प्रा.माहेश्वरी म्हणाले की, सर्व घटकांना सोबत घेऊन आपण काम करणार आहोत.  विचार विनिमय करुन संतुलित दृष्टिकोन आणि कामातील पारदर्शीपणा जपला जाईल.  “सबका साथ, विद्यार्थी विकास ” हा स्लोगन देत प्रा.माहेश्वरी यांनी अंमलात येऊ शकतील अशा नवनवीन कल्पनांचे स्वागत केले जाईल अशी ग्वाही दिली.

युट्युब लिंक👇

तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि विद्यार्थी नेतृत्वाच्या प्रयत्नातून या विद्यापीठाची स्थापना झाली आहे.  खडकाळ भूमीला नंदनवनाचे रुप देत अथक परिश्रमातून हे विद्यापीठ उभे राहिले आहे आणि या वाढीचा विकास करण्याची जबाबदारी आता सर्व घटकांवर आहे.  विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून सांघिक बांधणी केली तर या विद्यापीठाला निश्चितच उंची प्राप्त करुन देता येईल आणि ती सर्वांच्या सहकार्याने प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न राहील. कोविड परिस्थितीमुळे जे आळसावलेपण आले आहे ते दूर करण्यासाठी सर्व घटकांना प्रोत्साहन द्यावे लागेल.  ई-गव्हर्नन्सचा वापर, शिकविण्यासाठी ऑनलाईन ॲडजन्ड प्रोफेसरांना पाचारण, नवउद्योजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न, अध्यापनाच्या पध्दतीत काही नवे बदल अशा काही कल्पना डोळयासमोर असल्याचे प्रा.माहेश्वरी यांनी सांगितले.  आपल्या सारख्या सामान्य कुटुंबातील सामान्य शिक्षकाला या पदापर्यंत संधी दिल्याबददल त्यांनी ऋण व्यक्त केले.  प्रा.माहेश्वरी यांना बोलतांना दिवंगत वडीलांची आठवण येऊन गहिवरुन आले.

यावेळी ऑनलाईन बोलतांना मावळते कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन   यांनी या विद्यापीठाच्या कार्यसंस्कृतीचा गौरव केला.   सर्वांचे उत्तम सहकार्य लाभले.  विशेषत: प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांच्या कामाचा त्यांनी गौरव केला. माजी कुलगुरु प्राचार्य के.बी. पाटील यांनी प्रा.माहेश्वरी यांची कामाची पध्दती जवळून पाहिली असल्यामुळे ते या पदाला निश्चित न्याय देतील असे सांगत मनुष्यबळाची कमतरता व इतर अनेक आव्हाने उच्च शिक्षणासमोर आहे.  त्यावर मात करीत वाटचाल करावी लागेल असे मत व्यक्त केले.

माजी प्राचार्य अनिल राव यावेळी बोलतांना म्हणाले की, प्रा.माहेश्वरी यांच्यासाठी कुलगुरुपद हे साध्य नव्हे तर साधन आणि शिक्षणक्षेत्रात नवे काही करण्याचे माध्यम आहे. काय करायचे आहे याची स्पष्टता प्रा.माहेश्वरी यांच्याकडे आहे.  उद्दिष्टांची एकवाक्यता असायला हवी आणि प्रा.माहेश्वरी यांच्याकाळात विद्यापीठाला नवीन उर्जा मिळून प्रगती होईल असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला. प्रा. बी.व्ही. पवार यांनी प्रा.माहेश्वरी यांच्याकाळात विद्यापीठाचा नावलैाकिक वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.  व्य.प.सदस्य दिलीप पाटील यांनी प्रा.माहेश्वरी यांच्या ज्ञानाचा फायदा विद्यापीठाला निश्चित होऊन राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाची ओळख निर्माण होईल असे मत व्यक्त केले.  त्यांनी प्रा.ई.वायुनंदन यांचा कार्यकाळ उत्तम राहिल्याचे सांगितले.

याकार्यक्रमास प्रा.माहेश्वरी यांच्या मातोश्री सुशिलादेवी माहेश्वरी आणि पत्नी शैलजा माहेश्वरी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी केले. प्रभारी कुलसचिव प्रा.रा.ल.शिंदे यांनी आभार मानले.

पदभार स्वीकारण्यापूर्वी प्रा.माहेश्वरी यांनी गांधी टेकडी येथे महात्मा गांधी यांच्या पुतळयाला तसेच प्रशासकीय इमारतीत सरस्वती आणि बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला वंदन केले. प्रशासकीय इमारतीच्या मुख्य पायऱ्यांवर दुतर्फा उभे राहून कर्मचाऱ्यांनी प्रा.माहेश्वरी यांचे टाळयांच्या गजरात स्वागत केले.  प्रा.माहेश्वरी यांनी प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर डोके ठेऊन वंदन केले.  तसेच कुलगुरुच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी मातोश्रींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.  त्यांच्या या विनम्रतेने अनेकांना गहिवरुन आले.

या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य आर.एस. पाटील, प्राचार्य पी.पी.छाजेड, प्रा.एस.आर.चौधरी, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य राजू फालक, प्रा.मोहन पावरा, दीपक पाटील, प्रा.जे.बी.नाईक, डॉ.प्रिती अग्रवाल, एस.आर. गोहिल तसेच प्रा. पी.पी.माहुलीकर, प्रा. ए. बी.चौधरी, प्रा.अरुण इंगळे, प्रा.डी.एस. पाटील, प्रा.डी.एच.मोरे, प्रा.एस.आर.कोल्हे, प्रा.अनिल डोंगरे, प्रा. संजय थोरात, प्रा.एस.टी. इंगळे, डॉ. अनिल चिकाटे, डॉ.सुनील कुलकर्णी, प्रा. संजीवनी भालसिंग, डॉ.एस.आर.भादलीकर,  प्रा. नवीन दंदी, डॉ.मुनाफ शेख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.