उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक मिरवणूकांसाठी घ्यावी लागणार परवानगी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सवर पोलीस दलातील उच्चपदस्थांची बैठक घेतली.रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांत देशांतील काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने कुठलीही धार्मिक मिरवणूक काढण्यापूर्वी संबंधित संघटनेने रीतसर परवानगी घेतली पाहिजे, असा आदेश काढला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सवर पोलीस दलातील उच्चपदस्थांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी या सूचना दिल्या आहेत. आगामी अक्षय्यतृतीया आणि रमझान ईदच्या निमित्ताने पोलिसांनी अधिक दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी दिली.  फक्त पारंपरिक उपक्रमांनाच परवानगी द्यावी आणि नव्याने सुरू होत असलेल्या उपक्रमांना परवानगी दिली जाऊ नये, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

“धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना या फक्त ठरवून दिलेल्या ठिकाणीच झाल्या पाहिजेत, जेणे करून वाहतुकीला अडथळा होणार नाही. जी संघटना मिरवणूक काढणार आहे, त्यानी प्रतिज्ञापत्र सादर करून शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची कबुली दिली पाहिजेच, तरच त्यांना अशा मिरणुका काढण्याची परवानगी दिली जाईल,” असेही ते म्हणाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने सर्व धर्मांतील धर्मगुरूंशी संवाद साधून येत्या सण आणि उत्सवाच्या काळात हिंसाचार होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.