वादळी वाऱ्याचे बळी ; आदिवासी कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू

0

यावल ;- राविवारी रात्री झालेल्या वादळी वार्यामुळे आदिवासी वस्तीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच गुदमरून मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील थोरपणी येथे घडली असून सुदैवाने आठ वर्षीय बालक बचावला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि ,

संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये रविवारी दि. २६ मे रोजी संध्याकाळ रोजी यावल तालुक्याला वादळी वार्‍याचा फटका बसला. यात अनेक गावांमधील शिवारांमध्ये असलेले पीक जमीनदोस्त झाले असून शेतकर्‍यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे नानसिंग गुला पावरा यांचे कुटुंब हे दरवाजा बंद करून घरात बसलेले होते. इतक्यात वादळामुळे त्यांचे घर कोसळल्यामुळे नानसिंग, त्यांची पत्नी आणि तीन मुले असे एकूण पाच जण ढिगार्‍याखाली अडकले. त्यांना श्‍वास घेण्यासाठी अडचणी आल्या. यामुळे गुदमरून नानसिंग गुला पावरा ( वय २८ ), त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा ( वय २२) तसेच रतीलाल हा तीन वर्षाचा मुलगा तर बालीबाई ही दोन वर्षांची मुलगी जागीच ठार झाली. ढिगार्‍याखालून याच कुटुंंबातील शांतीलाल नानसिंग पावरा ( वय वर्षे ८) हा बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले.

थोरपाणी येथील दुर्घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मोहनमाला नाझरकर आणि पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी आपल्या सहकार्‍यांसह थोरपाणी या पाड्यावर धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत मृतदेह ढिगार्‍याखालून काढून शवविच्छेदनासाठी यावल येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मयत नानसिंग पावरा यांचे नातेवाईक दाखल झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.