मानसिक त्रास असह्य : अल्पवयीन तरुणाची आत्महत्या
चिठ्ठी लिहून म्हणाला, ‘मी आत्महत्या करतोय पण त्यांना सोडू नका..’
चोपडा | लोकशाही न्यूज नेटवर्क
चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुक या गावात एक घटनेने हादरवून सोडले आहे. येथील एका १७ वर्षीय मुलाने मानसिक त्रासाला कंटाळून चिठ्ठी लिहित आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगेश रेवानंद पाटील असे मृताचे नाव असून तीन जणांच्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याने परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी तपास केला असता मंगेशने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली असल्याचे आढळून आले. सदर चिठ्ठी पोलिसांना घरात सापडली आहे. त्यात “मला त्यांच्या हातातून मरायचे नाही, म्हणून मी आत्महत्या करतो आहे. पण त्यांना सोडू नका..” असा संदेश लिहिलेला आढळून आला. दरम्यान याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुकचा मंगेश पाटील परिवारासह वास्तव्यास आहे. जुलै २०२३ मध्ये महेंद्र पाटील, मनोज पाटील, पवन पाटील यांना मंगेश हा गावातील एका मुलीशी शाळेच्या बस स्टॉपवर बोलत असताना दिसला होता. दरम्यान या तिघांनी मंगेशला बेदम मारहाण केली होती.
त्यानंतर ११ जून २०१४ रोजी मंगेश हा कॉलेजच्या कामासाठी रस्त्याने जात असताना महेंद्र पाटील याने मंगेशच्या अंगावर दुचाकी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ केली. याबाबत मंगेशने त्याचे काका माजी सरपंच वसंतराव पाटील यांना सर्व घटना सागितली होती. ‘महेंद्र, मनोज पवन यांना समज द्या. ते मला कायम धमक्या देतात, त्यांच्या त्रासाला कंटाळलो आहे. नाहीतर आत्महत्या करेन‘ असे त्याने काकांना सांगितले होते.
दरम्यान त्याच्या वसंतराव पाटील यांनी सदर घटनाक्रम ग्रामीण पोलिसांना सांगून दम दिला होता. यावेळी पोलिसांनी देखील त्या तिघांना बोलावून समज देत सोडून दिले होते. असे वसंतराव पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
मंगेशने काय लिहिले चिठ्ठीत..
मंगेशने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी घरात पोलिसांना सापडली आहे. चिठ्ठीत त्याने “मला त्याच्या हातातून मरायचे नाही, म्हणून आत्महत्या करतो आहे. पण त्यांना सोडू नका. माझ्याने आता सहन नाही होणार. मला त्याने मारण्याची धमकी दिली आहे. मी फाशी लावून मेला तरी चालेल; पण मला त्यांच्या हातून मरायचे नाही…” अशा आशयाची चिठ्ठी त्याने मृत्यूपूर्वी लिहिली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.