हॅलो….हॅलो… उन्मेषदादा !

0

मन की बात (दीपक कुलकर्णी)

मातोश्रीची पायरी चढतांनाचा क्षण…. संजय सावंतांची लगीनघाई… अचानक संजय राऊत फार्मात… शिवबंध घेवून कार्यकर्ता तयार… अन्‌ लागलीच भ्रमनध्वनी खणखणू लागला, हॅलो…. हॅलो…. उन्मेशदादा….क्षणात दादा उंबरठ्यावर येवून उभे ठाकले आणि शिवबंधनाचा मंगळवारचा मुहुर्त हुकला. उद्धव ठाकरे गट हा मुहूर्त साधण्याच्या जोरदार तयारी होता आणि बुधवारी दुपारी हा मुहूर्त साधला देखील गेला. उन्मेषदादांनी ‘मशाल’ हाती घेतली खरी मात्र प्रश्न उरतो तो भ्रमनध्वनी करणारा नेता कोण आणि त्याचा उद्देश काय?

भाजपने लोकसभेची उमेदवारी कापल्यानंतर प्रथेप्रमाणे नाराजीनाट्याची सुरुवात झाली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील अनेक नाराजवीरांची मोट बांधण्यास मुहूर्त देखील गवसला. खासदार उन्मेष पाटील यांनी नाराजवीरांचे प्रतिनिधीत्व करीत ठाकरे गटाचे हात बळकट करण्याचा विडा उचलला. भाजपने गत काळात उन्मेष पाटील यांच्यावर दाखविलेला विश्वास त्यांनी क्षणात भंगूर करुन टाकला. आमदार, खासदार असे महत्त्वाचे प्रतिनिधीत्व दिले असतांनाही केवळ उमेदवारी कापली म्हणून विरोधात पाऊल उचलणे अपेक्षित नव्हते. भाजपमध्ये प्रत्येकाला समानसंधी असा कार्यक्रम असतांना आपण सांगू तीच पूर्व दिशा हे योग्य होत नाही. उन्मेष पाटील यांना ठाकरे गट सुरुवातीपासूनच उमेदवारी न देण्यावर ठाम होता. आजही उन्मेष पाटील तेथे गेले असले तरी त्यांना उमेदवारी मिळालीच नाही. तेथेही हाती धुपाटणेच आले.

उन्मेष पाटलांना दुसऱ्या उमेदवाराचा झेंडा हाती घ्यावा लागणार हे आता पक्क झाल आहे. मिळाले तर ते फक्त विधानसभेसाठीचे आश्वासन ! आश्वासनावर आजचे राजकारण चालत नाही हे उन्मेषदादांना सांगणे नको ! उद्या ठाकरे गटाला चाळीसगावसाठी दुसरा सक्षम उमेदवार मिळाला तर उन्मेषदादांना दिलेल्या आश्वासनाचे काय ? भाजपमध्ये राहून उन्मेष पाटलांना कुठे ना कुठे संधी मिळाली असती. देशभर भाजपचे वारे वाहत असताना विरोधात जाणे म्हणजे ‘बुडत्याचे पाय खोलात’ असेच होणार आहे. आजच उन्मेषदादांना कुठल्यातरी प्रकरणाचे ‘भय’ आहे. भाजपमध्ये राहिले असते तर कदाचित त्यांना ‘अभय’ मिळाले असते; मात्र आता तर त्यांच्यावर भाजपची वक्रदृष्टी पडत आहे. सहज सोपा असलेला भाजपचा विजय त्यांच्यामुळे वेगळ्या वळणावर येवून ठेपला आहे.

करण पवार या नवख्या उमेदवाराला ठाकरे गटाने संधी दिली असून करण पवार यांच्यापाठी महाविकासची शक्ती उभी राहू शकते. त्यांचे काका माजी मंत्री डॉ. सतिष पाटील हे शरद पवार गटात असल्याने त्यांचा करण पवारांना काही प्रमाणात लाभ होवू शकतो. मात्र उन्मेषदादांना तर आता सतरंजी उचलण्याचे काम करावे लागणार हे निश्चित ! टॉप टेन असलेल्या खासदाराने असे पाऊल उचलणे योग्य होईल की नाही हे काळच ठरवणार आहे.

असो राहिला प्रश्न तो त्या भ्रमनध्वनीचा…. तर तो भ्रमनध्वनी होता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा… विद्यमान खासदार ‘हात’ सोडत असले तर त्याला पकडून ठेवणे हे प्रदेशाध्यक्षांचे काम…. त्यांनी ते भ्रमनध्वनीच्या माध्यमातून केले मात्र तोपर्यंत ‘ज’ गायब झालेली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.