“तिकडे मिंधे बसलाय, जा त्याच्या दाढीखाली”- ठाकरेंची जहरी टीका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय म्हणून ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ते शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले. त्यांचा पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम वर्षा बंगला परिसरात पार पडला. या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. त्यांनी गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी जनसंवाद कार्यक्रमात रवींद्र वायकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. तसेच त्यांनी भाजपवरही टीका केली.

“काहीजण आजसुद्धा जात आहेत. जाऊद्या. मी काल म्हटलं, मी काल जोगेश्वरीच्या शाखा भेटीत एक प्रश्न विचारला होता, तोच तुम्हालाही विचारतो. छत्रपती शिवाजी महाराजांना साडेतीनशे वर्ष होऊन गेले. पण साडेतीनशे वर्षांनंतरही खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, अण्णाजी पंत यांची नावं घेतल्यानंतर आपण त्यांना काय बोलतो? ते साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांच्या कपाळावरचा गद्दार शिक्का पुसू शकले नाहीत तर आता जे गद्दारी करत आहेत त्यांना पुसायला किती जन्म घ्यावे लागतील?”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“प्रत्येकाने ठरवायचं आहे, मी खंडोजी खोपडेची अवलाद आहे की, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी यांचा मी वंशज आहे हे आपण ठरवायचं आहे. जे खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळचे औलाद आहेत, तिकडे मिंधे बसलाय. जा त्याच्या दाढीखाली. जाऊ शकता. कारण तो सुद्धा तीच औलाद आहे. गद्दार म्हटल्यावर गद्दारच”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“आता जे काही चालले आहेत, त्यांचं राजकीय आयुष्य, मी आता काही बोलत नाही. आता होऊ दे. त्यानंतर आपण बोलू. पण तूर्त तुम्ही सगळे जमलेले आहात. मी काल चार विधानसभा मतदारसंघात गेल्यानंतर तिकडे खासदार म्हणून कुणाच्या नावाची घोषणा केली? तुम्ही जबाबदारी घेणार? समोर कुणीही असो, मला नुसता विजय नको, डिपॉजिट जप्त करुन विजय पाहिजे. हा लढा निष्ठावान विरुद्ध गद्दार असा आहे. एका बाजूला देशभक्त आणि दुसऱ्या बाजूला द्वेषभक्त आहेत. असा हा लढा आहे. लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असा हा लढा आहे. मला असा कुणीही नकोय की, उद्या आपण जिंकल्यानंतर असं म्हणेल की, तुम्ही जिंकलात पण मी नव्हतो तिकडे. अरे जा तू पण जातो. तुला पण आडवा करतो. एवढी ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे. हुकूमशाही गाढून काढण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“शिवसेनेचं हिंदुत्व हे चूल पेटवणारं हिंदुत्वा आहे आणि भा*** पक्षाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. हा फरक आहे. मी आज सर्व जात-पातच्या लोकांना आवाहन करतोय की, आपले धर्म, जात बाजूला ठेवून हा देश हाच माझा धर्म आणि देशाच्या लोकशाही रक्षणासाठी आपण सगळे एकत्र येऊयात”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यांनी या वक्तव्यातून भाजपला शिवीगाळ केली.

Leave A Reply

Your email address will not be published.