निधी वाटपावरून भाजप नगरसेवक आक्रमक

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव महापालिकेच्या लोकनियुक्त प्रशासनाचा कारभार येत्या महिनाभरात संपुष्टात येतोय. त्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होईल. त्याआधी आपल्या प्रभागातील विकास कामे करण्यासाठी सर्वच नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे. सध्या महापालिकेत उद्धव ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजप असे नगरसेवक आहेत. उद्धव ठाकरे गटाचे महापौर उपमहापौर असून उद्धव शिवसेना आणि शिंदे शिवसेना गटाच्या नगरसेवकांनी निधी वाटप करून घेण्यात आघाडी मारली असून भाजप नगरसेवकांना डावलण्यात आले असल्याची भाजप नगरसेवकांची मुख्य तक्रार आहे. महाराष्ट्रात केंद्रात भाजपची सत्ता असताना आम्हाला निधी मिळण्यात दुजाभाव होत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही जनतेला तोंड दाखवणे मुश्किल होणार आहे. म्हणून भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जोरदार खडाजंगी झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशन या संपर्क कार्यालयात भाजपचे सर्व नगरसेवक आक्रमक होऊन डॉ. आयुक्त विद्या गायकवाड यांच्या संदर्भात तक्रारी केल्याने अखेर मंत्री गिरीश महाजन यांनी आयुक्त विद्या गायकवाड यांना संपर्क करून कार्यालयात बोलवून घेतले. आयुक्त विद्या गायकवाड नियमित काम करणाऱ्या अधिकारी आहेत. नियमांवर बोट ठेवणारे अधिकारी असल्यामुळे त्यांच्याविषयी अर्थात भाजप नगरसेवकांची नाराजी असणे साहजिक आहे. यापूर्वीसुद्धा आयुक्त विद्या गायकवाड हटाव मोहीम भाजपच्या नगरसेवकांनीच सुरू केली होती. त्यासाठी उपोषण आंदोलनही केले. तथापि या आंदोलनाचा फज्जा उडाला हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे आयुक्त गायकवाड यांच्यावर भाजप नगरसेवकांचा रोष कायम आहे. प्रशासकीय कालावधीत आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडून भाजप नगरसेवकांच्या प्रभागात कामे होणार नाहीत, ही भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांचा हा कांगावा सुरू आहे.

पाच वर्षांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावकरांना शहर विकासाचे ठोस आश्वासन दिले होते. विकास झाला नाही तर आमदारकीच्या निवडणुकीत मतदान मागायला मी तुमच्यासमोर येणार नाही, असे निक्षून सांगितले होते. त्यामुळे गिरीश महाजनांच्या शब्दावर विश्वास ठेवून जळगावकर जनतेने भाजपच्या पारड्यात भरभरून मतदान केले आणि 75 पैकी 57 नगरसेवकांना निवडून भाजपला निर्विवाद सत्ता मिळवून दिली. त्यानंतर भाजपने गेल्या पाच वर्षात शहर विकासासाठी योग्य पाऊल उचलले. शंभर कोटी विकास निधी मंत्री गिरीश महाजन यांनी मिळवून दिला, परंतु भाजप नगरसेवक शहर विकासाला केंद्रित करून काम करण्याऐवजी आपापसात लढत बसले. स्थानिक आमदार राजू मामा भोळे आपल्या पत्नीला महापौर करावे म्हणून अडून बसले. भाजप नगरसेवकांचा त्याला विरोध असताना नाईलाजास्तव आमदार राजू मामांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांच्या पत्नीला महापौर केले. आमदार आणि महापौर एकाच घरात असल्याने डबल इंजिन मुळे शहराचा झपाट्याने विकास होईल अशी अपेक्षा असताना त्या अपेक्षेची पूर्ती झाली नाही. शहर विकासात बोंबाबोंब सुरू झाली. भाजप नगरसेवकांची नाराजी पाहून अखेर मध्येच आमदारांच्या पत्नीला अडीच वर्षाच्या कालावधी आधीच महापौर पदावरून पायउतार व्हावे लागले. नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे महापौर झाल्या आणि शहराच्या कारभाराला गती मिळाली. परंतु अडीच वर्षाच्या कालावधीनंतर नवीन महापौर उपमहापौरांची निवड प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा भाजपच्या नगरसेवकांनी बंड पुकारून शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकवला. त्यावेळी दोन्ही शिवसेना एकच होत्या. अशाप्रकारे भाजपने आपल्या हातातील निर्विवाद मिळालेली सत्ता घालवली. आता सुद्धा आयुक्त विद्या गायकवाड यांच्या विषयी भाजपच्या नगरसेवकांचा हेतू शुद्ध नाही. व्यक्तिगत स्वार्थासाठी काही नगरसेवक आयुक्तांविरुद्ध भूमिका घेत असल्याने भाजप बदनाम होतोय. हे उपोषण आंदोलनावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांना फार विचारपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत. त्यातच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट भाजपबरोबर सत्तेत सामील झाला असल्याने निवडणुकीत राष्ट्रवादीला तसेच शिंदे गटाला आगामी निवडणुकीत जागा टिकवल्या पाहिजेत. त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्न सुद्धा भाजप पुढे मोठे आव्हान ठरणार आहे. अन्यथा सत्तेच्या या साठमारीत महाविकास आघाडी बाजी मारण्याच्या शक्यता नाकारता येत नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.