तब्बल ७१ वर्षांची जलतरुणी : सौ. स्वप्ना प्रकाश वाणी

0

लोकशाही विशेष लेख 

अकल्पितपणे वयाच्या ४० व्या वर्षी पोहणे शिकून सातत्याने सराव करून ३० वर्षात तब्बल १३३ पदकांची कमाई करून महिलांकरिता आदर्श निर्माण करणाऱ्या ठाणे सौ. स्वप्ना वाणी यांनी नुकतेच वयाच्या ७१ व्या वर्षात पदार्पण केले. १९९६ मध्ये पोहणे शिकून त्यांनी अत्यंत नियमितपणे पोहण्यास सुरुवात केली व घरचे शासकीय सेवेत असल्याने, तेव्हापासूनच अनेक ठिकाणी बदल्या होऊनही त्यांनी पोहोण्यातील जिद्द, मेहनत व विशेषतः सातत्य कायम राखले.

जिल्हास्तरावरील स्पर्धात भाग घेऊन त्यांनी सुरुवात केली, सूर गवसला आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारून ३६ स्पर्धांमध्ये भाग घेऊन ६९ सुवर्ण, ४५ रजत तसेच १९ कांस अशा १३३ पदकांच्या त्या आज मानकरी आहेत. त्यांनी मिळवलेली पदके ब्रेस्ट स्ट्रोक, बॅकस्ट्रोक, बटरफ्लाय आणि फ्री स्टाईल या जलतरण प्रकारातील आहेत. याशिवाय त्यांनी समुद्रातील जलतरण स्पर्धेत ७ वेळा व नौका नयन स्पर्धेत एकदा भाग घेऊन पारितोषिके मिळवली आहेत. त्यांना फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेश, हैद्राबाद, पंजाब, कर्नाटक इत्यादी राज्यातील वृत्तपत्रांनीही “समुंदर फतेह करनेकी तमन्ना राखनेवानी वाली”, “जिद्द आणि साहस”, “जलपरी” अशा विविध विशेषणांनी गौरविले आहे”. त्यांना “राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने” तसेच अनेक संस्थांनी सत्कार करून सन्मानित केले आहे.

त्यांना संगीताची ही आवड आहे, आज ७१ व्या वर्षीही त्या नियमितपणे पोहोण्यास जातात. पोहण्याने माणसाच्या संपूर्ण शरीरास व्यायाम मिळून तो दिवसभर ताजा तवाना, उत्साही आणि आरोग्यदायी राहतो असे त्यांचे ठाम मत आहे व त्या सर्वांनाच पोहण्याकरता सतत प्रोत्साहित करीत असतात. आतापर्यंत त्यांनी १२०० पेक्षा जास्त स्त्रिया व मुलांना पोहणे शिकवून एक आदर्श निर्माण केला आहे.

सौ. स्वप्ना वाणी, यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर सर्वांकरिता विशेषतः स्त्रिया व मुलांकरिता आदर्श निर्माण करणे खरोखरच प्रेरणादायी आहे. सौ. वाणी यांना ३५ व्या वर्षापर्यंत पोहण्याचा गंधही नसताना मोठा मुलगा मयूर याला नागपूर येथे शाळेत पोहणे अनिवार्य असल्याने, त्याला रोज पोहण्यास नेत असताना स्वतः पोहणे शिकण्याची इच्छा जागृत झाली. घरच्यांचा पाठींबा व प्रोत्साहन मिळाल्याने १९९० मध्ये नागपूर येथे त्या पोहायला शिकल्या. परंतु एकाच महिन्यात श्री. वाणी यांची पुणे येथे बदली झाली.

पुणे येथे रहिवासाच्या जवळपास तलाव नसल्याने पोहण्यात ४-५ वर्षाचा पूर्ण खंड पडला. १९९६ मध्ये पुणे येथून नाशिक येथे बदली झाली व बंगल्याजवळच महापालिकेचा तरणतलाव असल्याने मग मात्र त्यांनी अविरत सराव आणि पोहण्यात प्राविण्य मिळवण्याची जिद्द यांच्या जोरावर मेहनत करून स्पर्धेमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली, आणि त्यात मात्र आज पर्यंत खंड पडू दिला नाही.

गेल्या ३५ वर्षात त्यांनी जिल्हास्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारून जिल्हा राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत झालेल्या ३६ ठिकाणच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन विविध पोहोण्याच्या प्रकारात फ्री स्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक, बटरफ्लाय मध्ये १३३ पदके मिळवून आपले धाडस, मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर विशेषतः स्त्रियांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांना मिळालेल्या १३३ पदकात ६९ सुवर्ण, ४५ रजत, १९ कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यांनी आदर्श निर्माण करीत असतानाच स्त्रियांना जलतरणाद्वारे निरोगी व्यक्तिमत्व जगण्याचा संदेश दिला आहे. घराची संपूर्ण जबाबदारी अप्रतिमरित्या सांभाळून केलेले हे दिव्य वाखाणण्यासारखे आहे. सर्व स्त्रियांनी निरोगी व उत्साही राहण्याकरिता त्यांनी ठेवलेला हा आदर्श आहे.

पोहोण्याबरोबरच त्यांनी सात वेळा सागरी जलतरण स्पर्धा व एकदा नौकानयन स्पर्धेत भाग घेऊन त्यातही पदकांची कमाई केली. स्वतः पोहोण्याबरोबरच त्यांनी स्त्रिया व मुलांमध्ये जागृती निर्माण करून त्यांनाही पोहण्याचे प्रशिक्षण त्या देत असतात. आतापर्यंत जवळपास १२०० पेक्षा जास्त स्त्रियांना व मुलांना त्यांनी पोहणे शिकवले आहे. त्यांच्या एका विद्यार्थिनीने तर सहा महिन्यापूर्वीच वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी एलिफंटा कॅव्हस ते गेटवे ऑफ इंडिया असे अंतर पोहून विक्रम केला.

सौ वाणी यांचे महाराष्ट्रच नाही तर इतर राज्य मध्यप्रदेश, हैदराबाद, पंजाब, बंगलोर इत्यादी राज्यातील वृत्तपत्रांनीही “जिद्द आणि साहस” असलेले व्यक्ती, “समुंदर फतेह करने की तमन्ना रखने वाली”, “जलपरी” म्हणून गौरविले आहे. पोहण्याच्या क्षेत्रातील सातत्य यश व इतरांना विशेषतः स्त्रिया व मुलांना पोहणे शिकवून नियमित पोहण्यास प्रोत्साहित करण्याच्या कार्याबद्दल त्यांचा ठाणे येथील “गडकरी रंगायतन” मध्ये दोन वेळा जाहीर सत्कार झालेला असून “शिवछत्रपती संभाजी राजे बहुउद्देशीय संस्थेने”, महाराष्ट्र राज्य सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय “राजमाता जिजाऊ” जीवन गौरव पुरस्कार २०१७ मध्ये प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे.

पोहण्याबरोबरच त्या आपले पती श्री प्रकाश वाणी यांचे बरोबर आदिवासी दुर्गम भागात दौऱ्यावर जात. गडचिरोलीतील भामरागड, आलापल्ली, एट्यापल्ली इत्यादी, चंद्रपूर मधील राजुरा इत्यादी, धुळे जिल्ह्यातील अक्कलकुवा तळोदा इत्यादी, नाशिक मधील सुरगाणा कळवण इत्यादी, पुणे जिल्ह्यातील जुन्नर व नांदेड मधील किनवट वगैरे भागात दौऱ्यावर जात आणि आश्रमामधील आदिवासी विद्यार्थी, शिक्षक व विशेषतः आदिवासी गावातील महिलांशी संपर्क साधून चर्चा करीत. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना मार्गदर्शन व मदत करीत असत व काहींना आर्थिक मदत मिळवून देऊन रोजगाराचे उद्योग करण्यास प्रोत्साहित करीत असत. संगीत हा त्यांचा एक छंद आहे संगीत कार्यक्रमात त्या सतत भाग घेत असतात.

 

मयूर अकोले, ठाणे

Leave A Reply

Your email address will not be published.