ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा, सुशील कुमार (कुस्ती)

0

लोकशाही विशेष लेख

सुशील दिवान सिंह कुमार (Sushil Kumar) यांचा जन्म नजफगढ जिल्हयातील बापारोला या गावात झाला. त्यांचे वडिल दिवान सिंह हे बस चालक होते तर त्यांची आई कमला देवी ह्या एक गृहिणी आहेत. त्यांना कुस्तीची प्रेरणा त्यांचे मोठे भाऊ संदीप कुमार यांच्याकडून मिळाली. वडील व आपल्या भावासोबत त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासुनच कुस्तीचा सराव सुरू केला. सुरुवातीला त्यांनी यशवीर आणि रामपाल यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. मात्र आपल्या कौशल्याची चुणूक दाखवल्यावर अर्जुन पुरस्कारप्राप्त सतपाल यांनी त्यांना प्रशिक्षण दिले. रेल्वे शिबिरात त्यांना ग्यानसिंग आणि राजकुमार गुर्जर यांचे मार्गदर्शन लाभले. सुशील कुमार हे फ्री-स्टाईल गटामध्ये कुस्ती खेळतात. ६६ किलो वजनी गटात खेळतांना त्यांनी भारतासाठी २००८ च्या बीजींग ऑलिम्पिकमध्ये (Beijing Olympics) कांस्य पदक जिंकले, २०१० मध्ये जागतीक कुस्ती स्पर्धेत सूवर्ण व २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये (London Olympics) रौप्य पदक जिंकले. कुस्तीमध्ये रौप्य पदक जिंकणारे आणि सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक विजेती कामगिरी करणारे ते पहिलेच खेळाडू आहेत. २०१०, २०१४ व २०१८ अशा सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक विजेती कामगिरी केली आहे.

अशा या प्रतिभावान खेळाडूच्या कारकीर्दीस एक काळी किनार देखील जोडली गेली आहे. एक तर भारतात ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू खूप कमी प्रमाणात तयार झाले आहेत. त्यातही सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याच्या कामगिरीने फक्त कुस्तीमध्येच नाही तर भारताच्या संपूर्ण क्रीडा क्षेत्रात त्यांच्याविषयी आदर दुणावला होता. याच यशामुळे दिल्लीच्या कुस्ती वर्तुळातील सत्ता काही प्रमाणात त्यांच्या हातात आली होती. वरिष्ठ क्रीडा मार्गदर्शकाची खुर्ची त्याला बहाल करण्यात आली. मात्र कुस्तीच्या पटावर राजा असणारा हा खेळाडू याच सत्तेच्या आहारी गेला. याच सत्तेचा दुरुपयोग त्याने केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. अत्यंत अबोल आणि आपले गुरु सतपाल यांचा एकही शब्द खाली न पडू देणारा सुशील कुमार असाही वागू शकतो यावर आधी कुणाचाच विश्वास बसला नाही. मात्र जसजसे पुरावे गोळा झाले त्यानंतर मात्र सत्तेची नाश आणि गुर्मी काय करू शकते याचे “याची देही, याची डोळा” दर्शन झाले असे म्हणायला हरकत नाही.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, सुशील कुमार यांना २००५ मध्ये अर्जुन पुरस्कार (Arjuna Award), २००९ मध्ये राजीव गांधी खेलरत्न (Rajiv Gandhi Khel Ratna) आणि २०११ मध्ये पद्मश्रीने (Padmashri) सन्मानित करण्यात आले.

डॉ. निलेश जोशी, जळगाव
संपर्क : ७५८८९३१९१२

Leave A Reply

Your email address will not be published.