इस्रो अध्यक्षांची जीवनकथा : प्रा.उडुपी रामचंद्र राव

0

लोकशाही विशेष लेख

१९७२ चा तो काळ, रशिया व अमेरिका यांनी अवकाश क्षेत्रात बरीच प्रगती केली होती. आपल्या कडील वैज्ञानिक संस्थांना उपग्रह या संकल्पनेची फारशी माहिती नव्हती, अशा काळात भारताने ‘आर्यभट्ट’ हा पहिला उपग्रह सोडला. बेंगळुरुतील औदयोगिक वसाहतीत प्रयोगशाळेचा संसार मांडुन ‘आर्यभट्ट’ तयार केला. ‘इस्रो’ मधून या उपग्रह बांधणीची पायाभरणी केली ती प्रा. उडुपी रामचंद्र राव यांनी.

प्रा. राव यांचा जन्म १० मार्च १९३२ रोजी कर्नाटकातील अदमारू येथे झाला. म्हैसुर मधील शिक्षणानंतर त्यांनी मद्रास येथून विज्ञानात पदवी, बनारस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून पीएच.डी. पदवी घेतली. अमेरिकेतील एमआयटी संस्थेत अवकाशयानाच्या शिक्षणासाठी ते गेले. अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर डलास येथील टेक्सास विद्यापीठात ते प्राध्यापक पदी रुजू झाले. १९६६ साली मायदेशी परतल्यानंतर त्यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळा, अहमदाबाद येथे प्राध्यापक म्हणून काम करत असतांना अनेक विषयांवर संशोधन केले. तेथे त्यांना डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन लाभले. विकासाच्या दृष्टीने अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे हे लक्षात घेऊन प्रा. राव यांनी १९७२मध्ये भारतात उपग्रह तंत्रज्ञानाच्या स्थापनेची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९७५मध्ये पहिला भारतीय उपग्रह ‘आर्यभट्ट’ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर दळणवळण, रिमोट सेन्सिंग आणि हवामान सेवा प्रदान करण्यासाठी १८ पेक्षा अधिक उपग्रहांची रचना आणि प्रक्षेपण प्रा. राव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

पण हे सारे सहजासहजी शक्य झालेले नव्हते. उपग्रहबांधणीचा प्रस्ताव प्रा. राव यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढे मांडला. ‘साइट’ प्रकल्पात अमेरिकी उपग्रहाच्या मदतीने केरळातील नारळांच्या झाडांवर, पंजाब व हरीयाणातील पिकांवर पडलेले रोग उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांना दाखवण्यात आले; त्यामुळे भारताला उपग्रहाची गरज काय हे त्यांना वेगळे सांगण्याची गरज उरली नव्हती. प्रा. राव यांच्या प्रस्तावाला इंदिरा गांधींनी लगेच होकार दिला. प्रा. राव यांनी १९८४ ते १९९४ या काळात भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे नेतृत्व केले. सलग दहा वर्षे भारतीय अंतराळ खात्याचे सचिव व भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे चौथे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.

प्रा . राव यांनी रॉकेट तंत्रज्ञानाच्या विकासाला गती दिली, परिणामी ASLV रॉकेट आणि ऑपरेशनल PSLV प्रक्षेपण वाहनाचे यशस्वी प्रक्षेपण झाले, जे ध्रुवीय कक्षेत २ टन वजनाचे उपग्रह सोडू शकतात. प्रा. राव यांनी १९९१मध्ये भूस्थिर प्रक्षेपण वाहन GSLV आणि क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा विकास सुरु केला. त्यांनी आंतरग्रहीय भौतिकशास्त्र, उच्च ऊर्जा खगोलशास्त्र, अवकाश उपयोजन, प्रक्षेपक तंत्रज्ञान यावर किमान ३५० शोधनिबंध लिहीले. एकूण २५ विद्यापीठांच्या डॉक्टरेट पदव्या त्यांना मिळाल्या होत्या.

अंतराळ क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारने १९७६मध्ये देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ आणि २०१७मध्ये दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्म विभुषण’ प्रा. राव यांना प्रदान केला. इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ ऍस्ट्रॉनॉटिक्सचा थिओडोर व्हान करमान पुरस्कार तसेच युरी गागारिन पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. १९ मार्च २०१३ रोजी वॉशिंग्टन येथे अत्यंत प्रतिष्ठित ‘सॅटेलाइट हॉल ऑफ फेम’ मध्ये समाविष्ट होणारे तसेच मेक्सिको येथील अत्यंत प्रतिष्ठित ‘IAF हॉल ऑफ फेम’ मध्ये समाविष्ट होणारे प्रा. राव हे पहिले भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ ठरले.

मृदुभाषी व सहका-यांचा उत्साह वाढवणारे, वैज्ञानिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारे असे प्रा. राव यांचे व्यक्तिमत्व होते. भारतीय अंतराळ क्षेत्रात उपग्रह आणि प्रक्षेपक बांधणीचे जे पायाभुत काम झाले त्याचे संपूर्ण श्रेय हे प्रा. राव यांना जाते.

कु. गायत्री अशोक शिंदेकेसीई बी.एड. कॉलेज
जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.