जळगावच्या अवस्थेबद्दल न बोललेले बरे : सुरेशदादा जैन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

जळगावची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आजच्या शहराच्या अवस्थेबद्दल न बोललेलंच बरं. या परिस्थितीमुळे मलाही खूप दुःख होत आहे. मात्र मी आता राजकारणात नाही. शिवाय माझा कोणी राजकीय वारसही नाही. त्यामुळे मी आता त्यावर भाष्य करू इच्छित नाही. पुढे येऊन कोणीतरी नेतृत्व हाती घ्यावे आणि जळगावला पूर्वीचे दिवस परत आणावेत, अशी भावना माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

परखड मत मांडले 

एसडी सीड मार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेची माहिती देण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जमलेल्या पत्रकारांनी जळगाव शहराच्या दुरावस्थेबद्दल व संभाव्य राजकीय नेतृत्वाबद्दल त्यांना प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी जळगावच्या अवस्थेबद्दल परखड मत व्यक्त केले.

प्रगती थांबली

यावेळी बोलताना सुरेश दादा जैन म्हणाले की, जळगावकरांची अवस्था इतरांप्रमाणे मलाही दिसून येत आहे. जळगावचा विकास 1980 मध्ये सुरू झाला. मात्र 2004 नंतर जे जळगाव मी बघतो आहे त्यावर न बोललेले बरे. मी बोलूही इच्छित नाही. कोणीतरी पुढे यावे आणि या शहराच्या विकासाला परत सुरुवातीचे दिवस आणावेत. मागच्या वीस पंचवीस वर्षात प्रगती थांबलेली आहे. ती परत व्हावी असे मत यांनी व्यक्त केली.

आता रस नाही

चांगल्या गोष्टीसाठी नेतृत्व नियंत्रण आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. त्यावेळी माझी टीम चांगली होती आमच्याकडे एक विकासाचा व्हिजन होतं. सर्वांच्या मदतीने 15 ते 20 वर्ष शहर विकासासाठी आम्ही भरपूर काम केली. मात्र आता माझी पूर्वीची टीमही राहिलेली नाही. त्यामुळे मलाही आता रस राहिलेला नाही.

माझी मुले मुंबई व दुबईत असतात मुलगी मीनाक्षी जैन एस-डीसीडचे काम पाहते. त्यामुळे राजकारणाचा वारसा म्हणून म्हणाल तर पुढे कोणीही असेल असे मला वाटत नाही, असेही सुरेश दादा जैन म्हणाले. राज्याची सध्याची राजकीय अवस्था ही देखील उत्साहवर्धक आणि विशेष चांगली नाही असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.