दुर्दम्य इच्छाशक्ती अन द्रष्टे पद्मश्री मोठे भाऊ

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जळगाव जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्राच्या लौकिकात जेवढ योगदान राजकीय, सामाजिक नेत्याचं राहील आहे, तेवढंच किंबहुना काळाच्या अंगाने विचारात घेता त्या पेक्षा जास्त  स्व.पद्मश्री भवरलालजी जैन अर्थात मोठे भाऊ याचं असल्याचं म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. तात्विक प्रगल्भता आणि विचाराची स्पष्टता ही त्यांच्या जीवन प्रवासातील बलस्थाने असली तरी दुर्दम्य ईच्छा शक्तीच्या जोरावर परिश्रम पूर्वक त्यांनी जे वसुंधरेच साम्राज्य उभं केलं आहे, ते त्यांच्या अफाट कर्तृत्व शक्तीचं असामान्य उदाहरण आहे. आज या द्रष्ट्या व्यक्तींमत्वचं जन्म दिन संजीवन दिन म्हणून साजरा केला जातो, त्या निमित्त त्यांच्या गुण वैशिष्ट्यावर लिहिण्याचा केलेला हा प्रयत्न.

मोठे भाऊ यांना प्रतिथ यश उद्योजक म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव करणे संकुचित पणा चे ठरू शकते, कारण ते केवळ यशस्वी उद्योजकचं नव्हे, तर चिंतनशील साहित्यिक, विज्ञान तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते, भविष्याचा वेध घेणारा जलयोगी, केळी उत्पादक शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर च्या माध्यमातून उन्नतीचा मूलमंत्र देणारे मार्गदर्शक, अहिंसा विचारांचे प्रवर्तक असं एक नव्हे विविध विषयांवर आपल्या कतृत्वाचा अमीट ठसा उमटविणारे मोठे भाऊ खान्देशातील सर्वच समाजाचे सामाजिक मान्यता प्राप्त व्यक्तिमत्व. देश व राज्य स्तरावरील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंध असले तरी राजकारणा पासून अलिप्तता ठेवत, विविध जाती, धर्माच्या समुदायात ते “आपले मोठे भाऊ” म्हणून आपली शाश्वत ओळख कायम ठेवून होते.

काळाच्या ही पुढे विचार करणार व्यक्तिमत्त्व…!

शेतकरी कुटूंबाची पार्श्वभूमी असलेले मोठे भाऊ असामान्य बुद्धिमत्तेचे धनी तर होतेच पण माणसातील गुण ग्राहकता अचूक हेरून त्याचा चांगला उपयोग कसा करून घेता येईल हा पैलू ही विलक्षणच होता. शेत, माती, जल आणि माणसं हा त्यांच्या अभ्यासाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. म्हणून त्यांनी कृषी जलसिंचनात केलेले तंत्रज्ञानाधारीत आधुनिक प्रयोग जिल्ह्याच्या समृद्धीत माईल स्टोन ठरले. केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न वरदान म्हणून सिद्ध झाले. त्यांनी जल साक्षरता घडवून भू गर्भातून होणारा प्रचंड उपसा थांबवून कमी पाण्यात केळी चे उत्पादन ठिबकद्वारे घेता येते आणि टिश्यू च्या माध्यमातून दर्जेदार आणि भरघोस उत्पन्नाचा मार्ग शेतकऱ्यांना दाखविला. शेती व शेतकऱ्यासाठी त्यांनी केलेले यशस्वी प्रयोग शासन नावाच्या संस्थे पेक्षा किती तरी पटीने पुढे होते. त्याचा परिणाम आज जिल्ह्यात केळीचे क्षेत्र लक्षणीय प्रमाणात वाढले. केवळ जिल्ह्यातच नव्हे तर अगदी उत्तर प्रदेशात देखील जैन टिशू कल्चर पोहचविले. पत्रकार म्हणून अभिमानाने नमूद करणे मी माझे कर्तव्य समजतो, मी माध्यम प्रतिनिधी म्हणून बंगलोर (कर्नाटक) येथे सन 2002 मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय केळी परिषदेला उपस्थित होतो, त्या परिषदेत जगभरातील संशोधक सहभागी होते, केळीच्या टिश्यू बद्दल चर्चा सुरू होती, अनेक कंपन्यांनी त्यांचे टिशू किती दर्जेदार आणि निरोगी आहेत, हे सांगत प्रेझेंटेशन सादर करीत दावे केले. तेव्हा विविध नामांकित कंपन्यांचे दावे खोडत सहभागी संशोधकांनी “ओन्ली जैन’स टिशू ईज फ्री फ्रॉम व्हायरस”, असा निर्वाळा दिला. संशोधकांचा निर्वाळा ऐकून मला अभिमानास्पद वाटले. हे उदाहरण येथे देण्याचे कारण की, किती उच्च दर्ज्याचं तंत्रज्ञान टिशू मध्ये मोठे भाऊंनी आणलं होतं, की ज्याची कीर्ती जागतिक व्यासपीठावर केली गेली. केवळ उत्तमच नव्हे तर माझ्या शेतकरी बांधवाना सर्वोत्तमच मिळायला हवं, असा हट्ट किंवा बाणा मोठे भाऊंचा अनुभवास आला. शेतकऱ्यांबद्दल असलेला विलक्षण जिव्हाळा हीच साक्ष आहे. या कृषी महायोगिला सरकार नावाच्या संस्थेने कधीही प्रोत्साहन दिले नाही, ही पण त्यांच्या अभिनव प्रयोगाच्या प्रवासाच्या वाटचालीतील एक अधोरेखित वास्तव आहे. अश्या महान कृषी तपस्वीस विनम्रता पूर्वक अभिवादन.

और किसीं शायर ने क्या खूब कहा है…

“माना कि इस जमी को न गुलजार कर सके

कुछ खार कम तो कर गये गुजरे जिधर से हम !”

सुरेश उज्जैनवाल, पत्रकार तथा जिल्हाध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र.

Leave A Reply

Your email address will not be published.