जळगावात एसटी चालकाची सुसाईट नोट लिहून रेल्वेखाली आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. यामुळे मनस्थिती ठीक नसल्याने एसटी चालकाने टोकाचे पाऊल उचलत शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर डाऊन लाईनवर रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहचले असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर खांबा क्रमांक ४२०/२९/अ डाऊन लाईनवर आज सकाळी १० वाजेपुर्वी रेल्वेखाली आल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. १०.३० च्या सुमारास घटना गँगमनच्या निर्दर्शनास आली. शहर पोलीस ठाण्याचे हवालदार करुणासागर जाधव व आरपीएफचे सुरेश मीना यांनी घटनास्थळी पोहचून पुढील कार्यवाहीला केली.

दरम्यान रुग्णवाहिका पोहचल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास मृतदेहाच्या खिशामध्ये एक डायरी आढळून आली. यात असलेल्या ओळखपत्र आणि सुसाईड नोट वरून त्यांची ओळख पटली आहे. “माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येशी माझ्या परिवाराचा काहीही संबंध नाही” अशी सुसाईड नोटमध्ये लिहिलेले होते.

एसटी महामंडळाचे राज्यशासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचारी संप करीत आहेत. यामुळे बऱ्याच एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तर काहींना मानसिक तणावामुळे हृदयविकाराचा झटका येवून मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.