दहावी- बारावीच्या परीक्षा केंद्रांवर असणार बैठे पथक

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावी-बारावाची परीक्षा (SSC-HSC Exam) फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान होणार आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडणाऱ्या केंद्रांवर शिक्षण विभागातर्फे कठोर पावले उचलली जाणार असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठे पथक विशिष्ट शाळेत पूर्णवेळ हजर राहणार आहे.

परीक्षेच्या काळात कॉपीसारख्या गैरप्रकार टाळण्यासाठी बैठे पथक विशिष्ट शाळेत पेपरच्या संपूर्ण वेळेत बसून राहणार आहे. बैठे पथकात कमीत कमी चार सदस्य असतील. त्यातील दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉकमधून फेरी मारतील, दोन सदस्य परीक्षा केंद्राच्या आवारात लक्ष ठेवतील. परीक्षा दालनात गैरप्रकार निदर्शनास आल्यास पथकाने त्याची नोंद घेऊन केंद्र संचालकाच्या निदर्शनास आणावी. तसेच आवश्यक त्या सूचना पोलिसांना देण्यात येतील. तसेच परीक्षा केंद्राच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

औरंगाबाद विभागातील जालना, बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून बारावीचे 1 लाख 78 हजार 499 विद्यार्थी तर दहावीची परीक्षेसाठी 1 लाख 66 हजार 964 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामुळे या परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीची असेल. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दक्षता समिती, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस प्रशासन, शिक्षण विभागाने परीक्षा पारदर्शक व भयमुक्त वातावरणात घेण्यासाठी सज्ज असणार आहेत. तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती गठित करण्यात येणार आहे.

तसेच झेरॉक्स सेंटरवर प्रश्नांच्या उत्तरांची झेरॉक्स कॉपी करून मुलांना पुरवली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहेत. यंदा परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात परीक्षेच्या वेळी सुरू राहणाऱ्या झेरॉक्स सेंटरवर बंद ठेवण्यात येणार आहेत. झेरॉक्स सेंटर उघडे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.