श्रीमद्भगवद्गीता आणि आधुनिक जीवन सार

0

लोकशाही विशेष लेख

 

श्रीमद्भगवद्गीतेच्या (Srimad Bhagavadgita) पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की शारीरिक आणि मानसिक विशेषतः सतत विवेक बुद्धीने अंध आणि तितकाच अपंग असलेल्या धृतराष्ट्राने आपल्या राज्यव्यवस्थेकडे मुलांकडे आणि एकूणच समाज व्यवस्थेकडे केलेले दुर्लक्ष, त्यातून निर्माण झालेली परिस्थिती, शेवटी युद्धाची निर्माण झालेली अवस्था आणि या अवस्थेमुळे स्वतःच्या चुका माहित असूनही त्या दुर्लक्षित केल्याने अखेर हतबल होऊन या परिस्थितीत मोठ्या उत्कंठेने संजय याला विचारलेला प्रश्न अशी संमिश्र अवस्था व्यक्त करण्यात आलेली आहे. धृतराष्ट्राची केविलवाणी परिस्थिती कितीही दयनीय असली तरी संजय मात्र आपल्या स्पष्ट भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येतं. तो धृतराष्ट्राला या प्रश्नाचे उत्तर देताना सांगतो की,

सञ्जय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् ॥ २ ॥

मूळ अर्थ
सञ्जयः उवाच – संजय म्हणाला; दृष्ट्वा – पाहून; तु– पण; पाण्डव – अनीकम् – पांडवांचे सैन्य; व्यूढम् – व्यूहरचना; दुर्योधनः राजा दुर्योधन; तदा – त्या वेळी; आचार्यम् – शिक्षक, गुरू; उपसङ्गम्य – जवळ जाऊन; राजा – राजा; वचनम् – शब्द; अब्रवीत् – म्हणाला .

संजय म्हणाला : हे राजन ! पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढीलप्रमाणे बोलण्यास आरंभ केला.

संजय धृतराष्ट्राला (Dhritarashtra) म्हणाला की, “हे राजा पांडूच्या पुत्रांनी अर्थात पांडवांनी केलेली सैन्याची रणनीती आणि व्यूहरचना पाहून दुर्योधन (Duryodhana) उठून आचार्यांकडे म्हणजेच द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांना याबाबत सांगू लागला.”

मुळात दुर्योधन हा एक उत्तम राजकारणी, उत्तम कारस्थानी आणि तितकाच बलशाली असा राजा किंवा व्यक्ती म्हणून महाभारतात उल्लेखला गेला आहे. मात्र युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या विरोधक पांडवांनी तयार केलेली व्यूहरचना, युद्धनीती आणि रणांगणावरील एकूण परिस्थिती पाहिली आणि तो आपल्या गुरूंकडे अर्थात द्रोणाचार्यांकडे याबाबत चर्चा करण्यासाठी केला. वास्तविक दुर्योधन हा भित्रा होता, असं म्हणून चालणार नाही. कारण गदा युद्धासारख्या ताकदीच्या युद्धामध्ये प्रत्यक्ष भिमाला आव्हान देणारा व्यक्ती हा नक्कीच भित्रा नाही, हे इथे जाणलं पाहिजे. त्यामुळे दुर्योधनाचे द्रोणाचार्यांकडे वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी जाणं, याला भित्रेपणा म्हणता येणार नाही. काहीही झालं तरी तो मुत्सद्दीगिरीमध्ये प्रभावी असाच होता. त्याची घडवणूक, त्याच्यावर असलेले धृतराष्ट्राचे आणि कालांतराने शकुनी सारख्या मामाचे असलेले संस्कार त्याला अधिक प्रभावी बनवत होते. मात्र मनात कुठेतरी शंका असणे रास्त होते. ही शंका नेमकी काय? हे इथे स्पष्ट होणे गरजेचे आहे.

वास्तविक ज्याप्रमाणे पहिल्या श्लोकात ‘धृतराष्ट्राचा विचारलेला केविलवाणा आणि उत्कंठेने विचारलेला प्रश्न लक्ष वेधून घेतो, त्याचप्रमाणे दुसऱ्या श्लोकात ‘दुर्योधनाची आचार्य द्रोणांकडे जाण्याची कृती’ ही लक्षवेधी ठरते. धृतराष्ट्राचा बलशाली पुत्र दुर्योधन हा देखील आपल्या पित्याप्रमाणे कारस्थानी होता, यात तिळमात्र शंका नाही. वास्तविक महाभारतात त्याच्या कृतीतून दाखवलेल्या मूर्खपणाइतका तो वास्तविक मूर्ख होता, असं स्वीकारून मुळीच चालणार नाही. ज्या अर्थी तो पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या विरोधात उभा राहू शकतो, त्याअर्थी त्याच्याकडे नक्कीच विशेषत्वाने चतुर मात्र तेवढीच कारस्थानी विचारधारा असल्याचे नाकारता येणार नाही. ज्या कृष्णाला संपूर्ण जग परमेश्वर मानतं, त्या श्रीकृष्णाच्या विरोधात जाऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यामध्ये इतरांप्रमाणे त्याचाही महत्त्वाचा वाटा होता हे विसरून चालणार नाही. त्यामुळे तो भित्रा होता ही धारणा फोल ठरते.

दुर्योधन आपल्या आचऱ्यांकडे पांडवांच्या व्यूहरचनेबद्दल चर्चा करण्यासाठी गेला. आचार्य द्रोण हे सैन्याचे सेनापती आहेत. त्यामुळे त्यांना वस्तुस्थितीची आणि समोर असलेल्या आपल्याच विशेष शिष्यांची, त्यांच्या युद्धनीतीची जाणीव करून देण्यासाठी तो तिथे गेला. द्रोणाचार्यांना पांडू पुत्रांबद्दल असलेले प्रेम तो सर्वार्थाने जाणून होता. त्यामुळे या युद्धामध्ये लढा देत असताना पांडवांबद्दल असलेलं प्रेम द्रोणाचार्यांच्या मनात पुन्हा उत्पन्न होऊ नये, यासाठी तो सर्वार्थाने काळजी घेत होता. यातूनच त्याची राजकारणी आणि चतुरस्त्र बुद्धी लक्षात येते. दुर्योधन जरी धृतराष्ट्राचा पुत्र असला तरी तो कट कारस्थान आणि वातावरण निर्मितीत आपल्या बापा पेक्षा एक पाऊल नक्कीच पुढे होता. त्यामुळे यापुढल्या श्लोकांमध्ये द्रोणाचार्यांसमोर दुर्योधनाने मांडलेलं वास्तव, त्याची प्रभावी आणि राजकारणी वाणी त्याच्या चतुरस्त्र बुद्धीची नक्कीच कल्पना आणि त्याच्या मुत्सद्येगिरीचे प्रदर्शन या ठिकाणी घडवून आणते.

 

राहुल वंदना सुनिल

Leave A Reply

Your email address will not be published.