श्रीमद्भगवद्गीता आणि आधुनिक जीवन सार

0

लोकशाही, विशेष लेख

 

अध्याय एक : अर्जुनविषादयोग (श्लोक एक)
(कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण)

भगवद्गीतेत (Srimad Bhagavad Gita) पहिला अध्याय ‘अर्जुनविषादयोग’ या नावाने आहे. हे कुरुक्षेत्रातील युद्ध स्थळावर असलेल्या सैन्याचे निरीक्षण असून, जेव्हा युद्धाच्या पवित्र्यात दोन्ही पक्षातील सैन्य एकमेकांच्या समोर उभे होते, त्यावेळी महारथी म्हणवल्या जाणाऱ्या अर्जुनालाच दोन्ही पक्षांमध्ये आपलेच लोक अर्थात आपले म्हणवले जाणारे नातेवाईक, गुरु, मित्र, आप्तस्वकीय हे एकमेकांच्याच विरोधात उभे असलेले दिसले. युद्धभूमीवर एकमेकांचा जीव घेण्यासाठी आणि प्रसंगी आपल्या पक्षासाठी जीव देण्यासाठी उभे असलेले दिसून आले.

ही सर्व वास्तविकता पाहून अर्जुनला प्रचंड शोक झाला. त्याची शक्ती खचू लागली आहे, असं त्याला वाटायला लागलं. या एकत्रित अनुभवामुळे वास्तवामुळे त्याचं मन विचलित झालं आणि तो खऱ्या अर्थाने गोंधळला. या गोंधळलेल्या अवस्थेत अर्जुनाने युद्ध करण्याचा निश्चय मागे घेतला. या एकूण परिस्थितीच संपूर्ण दर्शन हे अर्जुनविषादयोग या पहिल्या अध्यायात आढळून येतं. अर्जुनविषादयोग या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक हा धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. धृतराष्ट्राच्या या प्रश्नानेच गीतेला सुरुवात होते. तो श्लोक असा की,

धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥१॥

श्लोकाचा मूळ अर्थ : धृतराष्ट्र उवाच- राजा धृतराष्ट्र म्हणाला; धर्म – क्षेत्रे – धर्मक्षेत्रावर, कुरुक्षेत्रे – कुरुक्षेत्र नावाच्या भूमीवर, समवेताः- एकत्रित आलेल्या, युयुत्सवः युद्धाची इच्छा करणाऱ्या; मामका: माझा पक्ष (माझ्या पुत्रांनी); पाण्डवाः- पांडुपुत्र च आणि एव – निश्चितपणे; किम् – काय: अकुर्वत – त्यांनी केले; सञ्जय — हे संजया.

या श्लोकात धृतराष्ट्र (Dhritarashtra) म्हणाला के, “हे संजया ! कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आल्यानंतर, युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केलं?”

या श्लोकाची पार्श्वभूमी अशी की मूळ प्रश्न असा निर्माण होतो की, श्रीमद् भगवद्गीतेची सुरुवात ही धृतराष्ट्राच्या प्रश्नानेच का सुरू झाली? वास्तविक धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली ही चर्चा श्रीमद्भगवद्गीतेच्या या श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचा मूळ आधार आहे. या दोघं व्यक्तींचा सुरुवात करण्यामागचा उद्देश हा फार गूढ अर्थाने लिहिलेला आढळतो. यातली एक व्यक्ती धूर्तराष्ट्र ही चक्षुहीन अर्थात डोळे नसल्यामुळे अंध अशी आहे, तर दुसरी व्यक्ती संजय ही दृष्टी असूनही दूरदृष्टी असलेली आहे. दोघांच्या वैचारिकतेमध्येही प्रचंड अंतर दिसून येतो. यातल्या धृतराष्ट्राला पांडवांबद्दल व्यक्तींचीतही प्रेम, आदर किंवा आपुलकी नाही. तर दुसऱ्या संजय या व्यक्तीला पांडवांप्रती धृतराष्ट्रांचे विपरीत विशेष आदर प्रेम करून दिसून येते.

या ठिकाणी धृतराष्ट्र ही व्यक्ती अशा डोळस व्यक्तींचे प्रतिनिधित्व करते, ज्यांना आपल्यासमोर असणारी परिस्थिती ही वाईट आहे हे माहीत असतानाही ते त्याकडे साफ दुर्लक्ष करतात किंवा तीचं समर्थन करीत करतात. यामुळेच धृतराष्ट्र हे पात्र महाभारतात आणि पुढे जाऊन भगवद्गीते प्रश्न विचारण्याच्या गुड विवंचनेत दिसून येतो. जेव्हा युद्धाला सुरू होणार असते त्याआधी संजय हा धृतराष्ट्राला रणभूमीवरील परिस्थिती सांगण्यासाठी त्याच्याजवळ असतो. धृतराष्ट्राचा पहिलाच प्रश्न असा आहे की, कुरुक्षेत्र अर्थात ज्या भूमीला धर्मक्षेत्र म्हटलं जातं त्या धर्मावर धर्मभूमीवर युद्धासाठी एकत्र आलेले माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र यांच्यामध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे? या भ्रमित प्रश्नात तो अडकलेला दिसतो.

या ठिकाणी आपल्या राजाच्या, धर्माचे आचरण न करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी कुरुक्षेत्राचा उल्लेख धर्मक्षेत्र (म्हणजे ज्या भूमीवर धर्म कार्य केलं जातं अशी जागा), असा उल्लेख एक विशेष अनुभूती आहे. मुळात धृतराष्ट्राला आपल्या पुत्रांच्या विजयासंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तो संजयला विचारू इच्छितोय की, माझ्या मुलांनी नेमकं काय केलंय आणि सोबतच पांडूचे पुत्र काय करत आहेत? वास्तविक या युद्धाच्या निर्मितीच्या कारणांपैकी एक कारण तो स्वतः असतानाही त्याची प्रश्न विचारण्याची उत्कंठा, आणि त्याच्या प्रश्नातील भय येथे विचारात घेण्यासारखे आहे.

मुळात ज्याला दोन भावांमध्ये तळजोड होता कामा नये, आणि राज्यकारभार फक्त आपल्याच मुलाच्या हाती यावा असे वाटणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी दिलेला हा प्रश्न आणि त्यातूनच भगवद्गीतेची सुरुवात, हे लेखन शास्त्रातील एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. त्याच्या प्रश्नामध्ये असलेली भीती ही उतार वयात माणसाला आपल्या चुकांची होणारी अनुभूती या अर्थाने दिसून येते. ज्या गोष्टीसाठी आपण कारण झालेलो असतो त्या गोष्टीचा त्या व्यक्तीला पश्चाताप नसला तरी ती गोष्ट त्याला किती त्रासदायक ठरू शकते, हे या प्रश्नातून सहज दिसून येते. कारण आपल्या पुत्रांचा, पांडूच्या पुत्रांच्या समोर टिकाव लागेल का? हा मूळ प्रश्न या श्लोकात केलेला दिसतो.

एकूणच काय तर धृतराष्ट्राचं अंधपणे (मग ते शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या अंधपणाने) आपल्या मुलांच्या चुकांकडे केलेले दुर्लक्ष हे किती घातक ठरू शकतं, त्यातून किती विपरीत परिस्थिती शेवटी निर्माण होऊ शकते आणि वेळ हातातून गेल्यावर फक्त त्या परिस्थितीला हतबल होऊन पाहण्याशिवाय काहीही पर्याय नसतो, या परिस्थितीचा अनुभव हा धृतराष्ट्राच्या केविलवाण्या प्रश्नातून दिसून येतो.

राहुल वंदना सुनिल

Leave A Reply

Your email address will not be published.