गुळवेल (भाग एक)

0

लोकशाही, विशेष लेख

 

दिव्य औषधी ‘गुळवेल’ (Gulvel) ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे. गुळवेल या वनस्पतीस ‘अमृता’ हे नाव देखील आहे. कारण, ती अमृतासमान गुणकारी आहे. गुळवेल माणसाच्या अगणित व्याधींना दूर करून त्यास दीर्घायुषी करते. गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्याव कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्याव बारीक दोर्याीसारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. गुळवेल ही दिसायला मनीप्लांटसारखी (Moneyplant) परंतु, अतिशय दाट अशी विशाल वेल असते. पाने हृदयाच्या आकाराची असतात. यास पिवळी फुले येतात व लाल रंगाची छोटी छोटी गोल फळे झुबक्यांमध्ये लागतात. याचे कांड रसभरीत असते, ज्याचा औषधीकरिता उपयोग केला जातो.

गुळवेलीची अमृतासमान, रसायनी वा वयस्था (तारुण्याचे रक्षण करून म्हातारपण व रोगाचा नाश करणारी) अशी आयुर्वेदीय समर्पक नावे आधुनिक संशोधनाने यथार्थ ठरली आहे. गुळवेलीच्या मोठ्या वेली मांसल असून, मोठ्या झाडांवर व कुंपणांवर पसरलेल्या असतात. खोड – वेलीच्या खोडास लांब धाग्यांसारखी, हिरवी मुळे फुटून ती खाली लोंबत असतात. खोड बोटांएवढे जाड असून, त्यावरील साल पातळ, त्वचेसारखी असते, नंतर तिचे पापुद्रे निघतात. खोडांवर लहान-लहान छिंद्रे असतात. खोड आडवे कापल्यास आतील भाग चक्राकार दिसतो. पाने – साधी, एक आड एक, हृदयाकृती. गडद हिरवी व गुळगुळीत असतात. पानांचे देठ लांब. पानांवर 7 ते 9 शिरा दिसतात व पानांची रुंदी 5 ते 10 सें.मी असते.

फुले – लहान पिवळसर- हिरवी नियमित व एकलिंगी असतात. पानांच्या बेचक्याहतून आलेल्या लांब, नाजूक, खाली लोंबणाऱ्या पुष्पमंजिरीत येतात. नर व मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येतात. पुष्पमंजिरीत नरफुले गुच्छात तर मादी फुले एकांडी येतात. पाकळ्या सहा, पुंकेसर सहा, बीजांडकोश तीन कप्पी, पराग धारिणी तीन विभागी. फळे – गोलाकार, मोठ्या वाटाण्याएवढी, कठीण कवची. पिकल्यावर लाल, गुच्छाने येतात. बी एक, खडबडीत कवच असणारी. गुळवेलीला नोव्हेंबर ते जून या कालावधीत फुले, फळे येतात. गुळवेल प्रतिकारशक्ती तंत्रास सशक्त करते. शरीराचे प्रतिकार शक्ती तंत्र विकृत झाल्यास वारंवार सर्दीपडसे, ताप येणे, अशक्तपणा ही लक्षणे निर्माण होतात.

गुळवेलच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. वारंवार आजारी पडणार्यार व्यक्तींना गुळवेलामुळे फायदा होतो. शरीरातील प्रतिकार शक्ती तंत्र विकृत झाल्यास अनेक व्याधी निर्माण होतात. विभिन्न एलर्जीजन्य आजार उदा. तसेच गुळवेल त्रिदोष शामक आहे. गुळवेल रोगप्रतिकार तंत्रास सामान्य करते. अशा व्याधींवर गुळवेल अतिशय उपयोगी आहे. गुळवेल हे संधीवात व अन्य वात व्याधींवर उपयोगी आहे. गुळवेल शक्तिवर्धक व वाजीकर आहे. विभिन्न चर्मरोग विशेषतः प्रभावी आहे. मूळव्याध, महिलांचे प्रमेहादी विकारावर उपयोगी. मानसिक व्याधींवर उपयोगी. गुळवेल रक्तातील कोलेस्टेरॉल व रक्तशर्कराचे प्रमाण कमी करते. गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. तिचे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात. गुळवेल कुटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक, मूत्रजनन, ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे.

ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे. ती रक्तसुधारक असून, पित्तवृद्धीच्या काविळीत गुणकारी व त्वचारोगात उपयोगी आहे. मधुमेह, वारंवार मूत्रवेग तसेच प्लिहावृद्धीत उपयुक्त आहे. गुळवेल कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे. गुळवेलीचे सत्त्व व काढा वापरतात. गुळवेलीचा पाण्यातील अर्क ज्वरनाशक म्हणून वापरतात. गुळवेलीचा काढा शक्तिवर्धक असून, दुर्बल करणारे रोग, खंडित ताप आणि अपचनात वापरतात. गुळवेल सत्त्व दीर्घकालीन आम्लअतिसारात वापरतात. आतड्यांचा प्रक्षोम आणि शक्ती क्षीण झालेली असताना तसेच संधिवाताची लक्षणे दूर करण्यासाठी ही औषधी वनस्पती महत्त्वाची मानली जाते. सौम्य विषमज्वरात आणि जीर्णज्वरात गुळवेलीचा चांगला उपयोग होतो. गुळवेलीने भूक लागते, अन्नपचन चांगले होते, रोग्याचा फिक्कटपणा कमी होतो, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते. कुपचन (Kupchan), पोटदुखी व काविळीत (Jaundice) गुळवेल गुणकारी आहे. ही वनस्पती त्वचारोगातही उपयुक्त आहे, यामुळे अशाची खाज व दाह कमी होतो.

संतोष ढगे, सांगली
८२०८४२६४९४

Leave A Reply

Your email address will not be published.